सूर्यगंगा नदीचा पर्यायी पूल पुरात वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 10:26 PM2019-06-30T22:26:12+5:302019-06-30T22:26:26+5:30
तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथे उंच पुलाचे बांधकाम सुरू असून, वाहतुकीसाठी केलेला पर्यायी पूल शनिवारी रात्रीच्या पहिल्याच पावसाच्या पुराने वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, नवीन पूल बांधून तयार होणास वर्षभराचा कालावधी लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथे उंच पुलाचे बांधकाम सुरू असून, वाहतुकीसाठी केलेला पर्यायी पूल शनिवारी रात्रीच्या पहिल्याच पावसाच्या पुराने वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, नवीन पूल बांधून तयार होणास वर्षभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी पूल बांधण्यात आले खरे; मात्र तोही निकृष्ट दर्जाचा बांधला असल्याने पहिल्याच पुराच्या ओघात वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीची समस्या ऐरणीवर आली असून, अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे.
येथील सूर्यगंगा नदीवरील उंच पुलाचे बांधकाम विशेष प्रकल्प विभाग केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत सुरू आहे. त्यामुळे जुना लहान पूल पाडून हा पूल उंच बांधण्याचे काम आठ महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी त्या बाजूला एक पयार्यी पूल बांधण्यात आला आहे. मात्र तिवसा तालुक्यात शनिवारी मुसळधार पाऊस पडल्याने या सूर्यगंगा नदीला पूर आला होता,त्यामुळे पर्यायी बांधलेल्या पुलावर पुराचे पाणी गेल्याने रात्रीच हा पूल खचून वाहून गेला. या पुलाला पाण्याने कोरपून नेले आहे. पुलाचे बांधकाम सुरू असल्याने कंत्राटदार यांनी पर्याय म्हणून या पुलाचे बांधकाम केले. परंतु तो निकृष्ट दर्जाचा बनविल्यामुळे गावातील संपर्क तुटला आहे. तिवसा बांधकाम विभाग यांचे कामावर दुर्लक्ष असल्याकारणाने कंत्राटदारांनी जुन्या पुलामधील काढलेला लोहा सरळ करून नवीन पुलाच्या बांधकामात वापरला. त्यामुळे नवीन पूलसुद्धा धोकादायक ठरू शकतो. या पुलाच्या बांधकामावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. सद्यस्थितीवरून येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. सध्या खचलेला पूल दुरुस्ती करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू असून, या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा रस्ता तिवसा चांदूर रेल्वे राज्य महामार्ग असल्यामुळे या पुलावरून दररोज शेकडो वाहने धावतात. मात्र, पूल पुराच्या पाण्यामुळे खचल्याने वाहतुकीस आता धोकादायक ठरणार आहे.