घरात आई, काकाचा मृतदेह असतानाही तिने दिला पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 03:47 AM2018-03-02T03:47:43+5:302018-03-02T03:47:43+5:30
घरात आई आणि काकाचा मृतदेह अन् संपूर्ण गाव शोकमग्न झाले असतानाही दहावीेचा पेपर सोडविण्याचा कठीण प्रसंग एका विद्यार्थिनीवर आला.
नरेंद्र जावरे
परतवाडा (अमरावती) : घरात आई आणि काकाचा मृतदेह अन् संपूर्ण गाव शोकमग्न झाले असतानाही दहावीेचा पेपर सोडविण्याचा कठीण प्रसंग एका विद्यार्थिनीवर आला. तिला ही बातमी पेपर झाल्यानंतर सांगण्यात आली. एकाचवेळी घरातील दोन जणांच्या मृत्यूमुळे चिखलदरा तालुक्याच्या डोमा येथे होळीला गावात चुली पेटल्या नाही. ललिता संजू बछले (३५) असे आईचे, तर विनोद नेहरू बछले (३४, रा. डोमा. ता. चिखलदरा) असे काकाचे नाव आहे.
गंभीर आजारी झालेल्या ललिता बछले यांना मंगळवारी रात्री नागपूर येथे उपचारार्थ हलविण्यात आले होते. त्यांचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. विनोद बछले यांना उपचारासाठी यवतमाळला नेताना बुधवारी सायंकाळी वाटेतच परतवाड्यानजीक त्यांचा मृत्यू झाला. संजू बछले यांची मुलगी नेहाची गुरुवारपासून दहावीची परीक्षा सुरु झाली. तिचे परीक्षा केंद्र म्हसोना आदिवासी आश्रमशाळा होती. गुरुवारी मराठीचा पहिला पेपर होता. नेहाला आई आणि काकाच्या निधनाबाबत कुटुंबीयांनी सांगितले नाही. पेपर सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत असल्याने पेपर सोडवून झाल्यावर तिला ही दु:खद बातमी सांगण्यात आली.
दोघांचे आॅपरेशन अन् मृत्यू थोड्या फरकाने
ललिता बछले आणि विनोद बछले या दीर-भावजयीला सात वर्षापूर्वी हृदयाच्या व्हॉव्ल्हच्या आजाराचे निदान झाले. दोघांचे मुंबई येथे दोन तासांच्या अंतराने आॅपरेशन करण्यात आले होते.
बुधवारी दोघांचा मृत्यूसुद्धा एवढ्याच तासांच्या फरकाने झाला. दीर-भावजयीचा मृत्यू झाल्याची माहिती पंचक्रोशीत पसरताच शोककळा पसरली.
>दोघांचे आॅपरेशन अन् मृत्यू थोड्या फरकाने
ललिता बछले आणि विनोद बछले या दीर-भावजयीला सात वर्षापूर्वी हृदयाच्या व्हॉव्ल्हच्या आजाराचे निदान झाले. दोघांचे मुंबई येथे दोन तासांच्या अंतराने आॅपरेशन करण्यात आले होते. बुधवारी दोघांचा मृत्यूसुद्धा एवढ्याच तासांच्या फरकाने झाला. दीर-भावजयीचा मृत्यू झाल्याची माहिती पंचक्रोशीत पसरताच शोककळा पसरली.