मोर्शीत तब्बल सत्तर लाखांचे ॲल्युमिनियम जप्त; सूत्रधारासह दोघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2022 01:52 PM2022-11-26T13:52:51+5:302022-11-26T14:07:55+5:30
२९ टनांपैकी २७ टन मिळाले; मोबाईल लोकेशनने झाली उकल
मोर्शी (अमरावती) : तब्बल सत्तर लाखांच्या चोरीला गेलेल्या २७ मेट्रिक टन ॲल्युमिनियम प्लेट जप्त करून मोर्शी पोलिसांनी मुख्य आरोपीला २४ तासांत अटक केली. हा माल गुजरातहून भिलाईला नेण्यात येत होता.
अलीम खान (३८, रा. पिंपळपुरा, मोर्शी) व अजहर खान (३८, रा. गुलिस्तानगर, लालखडी, अमरावती) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. छत्तीसगढमधील रायपूर येथील विपीन जैन यांच्या तब्बल ७० लाखांच्या अल्युमिनियम प्लेट घेऊन एक ट्रक अहमदाबाद येथून भिलाईकडे रवाना झाला. १९ नोव्हेंबर रोजी ट्रकचे जीपीएस लोकेशन बंद झाल्याने मालकाने चालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याच्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क होत नसल्याने त्यांनी ट्रकचा शोध घेत अमरावती-नागपूर महामार्गावरील तिवसा गाठले.
२२ नोव्हेंबर रोजी मोर्शी-वरुड महामार्गावरील भाईपूर गावाजवळ हा ट्रक बेवारस अवस्थेत दिसून आला. २३ नोव्हेंबर रोजी मोर्शी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मोर्शीतील भंगार व्यावसायिक अलीम खान सलीम खान याच्या गोदामात हा माल साठविला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यावरून अलीम खा व अजहर खान या दोघांना मोर्शीतून अटक करण्यात आली. चोरीला गेलेल्या अॅल्युमिनियम प्लेट ताब्यात घेतल्या. ही कारवाई एसपी अविनाश बारगळ यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे व मोर्शीचे ठाणेदार श्रीराम लांबाडे यांच्या चमूने केली.