अमरावतीत जिल्हा बॅकच भरणार शेतकऱ्यांचा पिकविमा; संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
By जितेंद्र दखने | Published: June 20, 2024 08:04 PM2024-06-20T20:04:55+5:302024-06-20T20:06:35+5:30
नवनिर्वाचित खासदारांना बँकेत मानाची खुर्ची
अमरावती: शासनाच्या एक रूपयात विमा योजनेतील बँकेच्या खातेदार सर्वच शेतकऱ्यांचा एक रूपया बँके मार्फत भरणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना केवळ कागदपत्रे जमा करावी लागणार आहे. हा निर्णय एकमताने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये अध्यक्ष आ.बच्चु कडू, उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी घेतला.यावेळी बँकेचे संचालक बळवंत वानखडे हे खासदार म्हणुन निवडून आल्याने त्यांचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करीत त्यांच्यासाठी बैठकीत गुरूवार २० जून रोजी बॅकेचे अध्यक्ष,उपाध्यक्षांनतर पहिल्या क्रमाकाची खुर्ची राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, हा निर्णय घेणारी अमरावती जिल्हा बँक ही राज्यात आयडॉल ठरल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. याशिवाय मागील बैठकीत झालेल्या ठराववावर विरोधकांनी आक्षेप घेतला असताना अध्यक्षांनी त्यांचे आक्षेप फेटाळत ठरावांना मंजुरात दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात पंतप्रधान पीकविमा योजना सुरू केल्यानंतर या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांकडून नाममात्र एक रुपया रक्कम म्हणून घेतली जात होती. ही रक्कम अत्यल्प असली तरी संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव, प्रवासखर्च असा ३०० ते ४०० रुपयांचा खर्च येतो. शिवाय या प्रक्रियेसाठी लागणारा वेळसुद्धा वाया जात होतो. हीच अडचण लक्षात घेता जिल्हा बँकेने आता शेतकऱ्यांच्या बाजूची पीकविम्याची एक रुपयाची रक्कम भरण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने पारित केला. बैठकीत बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू, उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी हा ठराव मांडला. त्याला सर्वसंमतीने मंजूरी देण्यात आली. बैठकीला संचालक तथा माजी अध्यक्ष बबलू देशमुख, खासदार बळवंत वानखडे, प्रा. वीरेंद्र जगताप, हरिभाऊ मोहोड, नरेशचंद्र ठाकरे, प्रवीण काशीकर, सुधाकर भारसाकळे, प्रकाश काळबांडे, मोनिका मार्डीकर, बाळासाहेब अलोने, चित्रा डाहाणे, दयाराम काळे, सुरेश साबळे, अजय मेहकरे, श्रीकांत गावंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल उपस्थित होते.