अमरावतीकरांनो कर भरा, अन्यथा मालमत्ता जप्ती; वसुली ६० टक्क्यांवर

By प्रदीप भाकरे | Published: February 8, 2023 04:09 PM2023-02-08T16:09:05+5:302023-02-08T16:14:23+5:30

झोननिहाय शिबिरांमध्ये वाढ; २८ फेब्रुवारीपर्यंत मिळवा दंडामध्ये ५० टक्के सुट

Amaravati residents pay taxes or else property confiscation proceedings will take place next week | अमरावतीकरांनो कर भरा, अन्यथा मालमत्ता जप्ती; वसुली ६० टक्क्यांवर

अमरावतीकरांनो कर भरा, अन्यथा मालमत्ता जप्ती; वसुली ६० टक्क्यांवर

Next

अमरावती : मालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांनी २८ फेब्रुवारीपर्यंत मालमत्ता कराची थकीत रक्कम व दंडाची ५० टक्के रक्कम भरणा केल्यास त्यांना ५० टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात दंडात्मक रकमेवर सूट मिळणार आहे. दरम्यान, नागरिकांनी थकीत कर न भरल्यास पुढील आठवड्यात मालमत्ता जप्तीची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात वसुलीचा टक्का ६० च्या आसपास पोहोचला आहे.

महानगरपालिकेच्या संकलन केंद्रावरही रोख, धनादेश, धनाकर्ष, क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातूनही मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. महानगरपालिकेची कर संकलन केंद्र शनिवार व रविवार सुरू ठेवण्यात येणार आहे. पुनर्गनणेअंती मालमत्ता करांची रक्कम व सवलत वगळून उर्वरित दंडात्मक रक्कम एकाचवेळी भरणे अनिवार्य आहे. टप्प्याटप्प्याने भरणा केलेल्या रकमेस विशेष योजना लागू राहणार नाही. त्यामुळे नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व जप्तीची कारवाई टाळावी असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी केले आहे.

४० टक्के वाढीच्या स्थगितीचा फटका

४० टक्के दरवाढ समाविष्ट करून सन २०२२/२३ या आर्थिक वर्षात एकुण ६१ कोटी ९९ लाख रुपये कराची मागणी दर्शविण्यात आली. मात्र, उपमुख्यमंत्र्यांनी त्या दरवाढीला स्थगिती दिल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला होता. अखेर महापालिका प्रशासनाला आदेश काढून, झोनस्तरावर तशी प्रसिध्दी करावी लागली. कराची एकुण रक्कम १००० रुपये असेल तर ६०० रुपये भरायचे का, अशी विचारणा सामान्यांकडून करण्यात आली. त्याची उत्तरे देण्यात अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठे कष्ट घ्यावे लागले. मात्र, तरिही नागरिकांकडून ४० टक्के दरवाढ, सामान्य कर, स्वच्छता करांबाबत विचारणा केली जात आहे.

आता शिबिरांवर भर

थकीत कर झोनस्तरासह ऑनलाईन देखील भरला जातो. मात्र आर्थिक वर्ष संपायला उणेपुरे ५० दिवस शिल्लक असल्याने महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी झोनस्तरावर विशेष शिबिरे घेण्याची सुचना केली आहे. सोबतच, मोठ्या थकबाकीधारकांची यादी तयार केली जात असून, त्यांच्या मालमत्ता जप्त का करण्यात येऊ नये, अशा नोटीस पाठविण्यात येणार आहेत. कर संकलन अधिकारी महेश देशमुख यांच्यासह सहायक आयुक्त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, योगेश पिठे, तौसिफ काझी व श्रीरंग तायडे हे अधिकारी कामाला लागले आहेत.

Web Title: Amaravati residents pay taxes or else property confiscation proceedings will take place next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.