रात्रीच्या सुसाट ट्रकवाहतुकीने अमरावतीकरांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:05 PM2018-10-29T23:05:25+5:302018-10-29T23:06:03+5:30
रात्री १० नंतर शहरात सुसाट निघणाऱ्या ट्रकची वाहतूक जीवघेणी ठरत आहे. नुकत्याच बडनेरा हद्दीत मद्यधुंद ट्रकचालकांनी घडलविलेल्या दोन गंभीर अपघातावरून हा प्रकार अधोरेखित होतो. अमरावती - बडनेरा मार्ग रात्रीच्या वेळी जीवघेणा ठरत आहे. अशा ट्रकचालकांच्या मनमानीवर लगाम लावणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रात्री १० नंतर शहरात सुसाट निघणाऱ्या ट्रकची वाहतूक जीवघेणी ठरत आहे. नुकत्याच बडनेरा हद्दीत मद्यधुंद ट्रकचालकांनी घडलविलेल्या दोन गंभीर अपघातावरून हा प्रकार अधोरेखित होतो. अमरावती - बडनेरा मार्ग रात्रीच्या वेळी जीवघेणा ठरत आहे. अशा ट्रकचालकांच्या मनमानीवर लगाम लावणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शहरात मालवाहू ट्रक वाहतुकीस दिवसातील काही तास नो-एन्ट्री असतानाही काही प्रमाणात ट्रकची वाहतूक सुरूच आहे. दिवसाच्या वर्दळीत ट्रकची वाहतूक सुरळीत होत असली, तरी रात्रीच्या वेळेत ट्रक चालकांचा मनमानी कारभाराला उधाण येते. वलगाव मार्ग चित्रा चौकाकडून शहरात शिरणारे ट्रक रात्री १० वाजतानंतर सुसाट धावत असल्याने शहरातील वाहनचालकांच्या जिवाला घोका निर्माण झाला आहे. कर्कश हार्न वाजवीत ६० किमी प्रतितासाची वेगमर्यादा ओलांडून हे ट्रक सुसाट जात असल्याने अन्य वाहनचालक भयभीत होतात. यामध्ये बहुतांश ट्रक परराज्यातील असून, या ट्रकचालकांचा मनमानी कारभार रात्रीच्या वेळी पाहायला मिळत आहे. शनिवारी सायंकाळी बडनेरा हद्दीतील राममाळ हॉटेलसमोर पोलिसांनी एका कन्टेनर चालकास ताब्यात घेतले असता, तो मद्यधुंद अवस्थेत होते. हे सुसाट ट्रक नागपूर गेट, गाडगेनगर, कोतवाली, राजापेठ व बडनेरा या पाचही ठाण्याच्या हद्दीतून सुसाट वेगाने जातात, तरीसुध्दा आजपर्यंत अशा ट्रकांवर अंकुश ठेवण्यात आले नाही. त्यामुळे भरधाव ट्रकचा एक मजुर बळी ठरला आहे.
लगाम लावणार कोण? : अमरावती-बडनेरा मार्गावरील वाहतूक जीवघेणी
मैने बहोत लोगो को उडाया, मद्यधुंद चालकाचे भाष्य
भरधाव कन्टेनर क्रमांक पीबी-१३-एडब्ल्यू-६६६२ शनिवारी सायंकाळी बडनेरात अनेक ठिकाणी धडक देत पलायन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ठाणेदार शरद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गणेश अहिरेंचे पोलीस पथकाने कन्टेनरचा पाठलाग केला. चालक कन्टेनर सिने स्टाईल कन्टेनर पळवित होता, तर त्याचा मागोवा पोलीस घेत होते. अखेर पोलिसांनी कन्टेनरला रानमाळजवळ गाठले. चालक कप्तानसिंग गजेंद्रसिंग तोमर (रा.कुटीला, राज्य मध्यप्रदेश) याला मद्यधुंद अवस्थेत ताब्यात घेतले. अशा अवस्थेत चालक मालाने भरलेला कन्टेनर चालवीत होता. मैने बहोत लोगोको उडाया, असे भाष्य त्याने पोलिसांसमोर केले. कन्टेनरच्या मध्यभागाचा चुराडा झाला. त्यामुळे कन्टेनरने अनेक जागी धडक दिल्याचे दिसत होते. पोलिसांनी चालकास अटक करून गुन्हा नोंदविला.
काशीरामला मद्यपी चालकानेच ट्रकखाली चिरडले
२३ आॅक्टोबर रोजी काशीराम चिपाल शेलुकार (२०,रा.चिखलदरा, ह.मु.अमरावती) हा मजुरीचे काम आटोपून खोलीवर जात होता. त्यावेळी नेमाणी गोडावूनसमोरील रोडवर काशीरामला मद्यधुंद चालक गोरखनाथ दशरथ भगत (४०,रा.हमालपुरा) याच्या एमएच११ एम-५२०९ या क्रमाकांच्या ट्रकने चिडरले. वाहन भरधाव व निष्काळजीपणाने चालवून काशीरामला धडक दिल्याचा गुन्हा बडनेरा पोलिसांनी नोंदविला. पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले असता, तो अतीमद्यप्राशन करून ट्रक चालवित असल्याचे निदर्शनास आले होते. रात्रीच्या वेळेत ट्रक चालक मद्यपी अवस्थेत ट्रक चालवून नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचे या अपघातावरून स्पष्ट झाले आहे.
मालवाहू ट्रक शहरातून वेगाने जात असेल, तर त्यावर लक्ष देऊन कारवाई करता येईल. यासंबंधाने अधिकाऱ्यांना निर्देश देऊ.
- रणजित देसाई,
सहायक पोलीस आयुक्त