अंबाडा गट, गणासाठी इच्छुक बाशिंग बांधून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:15 AM2021-08-23T04:15:22+5:302021-08-23T04:15:22+5:30
अंबाडा : अमरावती जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समित्यांचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये संपणार आहे. त्यापूर्वीच या निवडणुकीसाठी इच्छुक ...
अंबाडा : अमरावती जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समित्यांचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये संपणार आहे. त्यापूर्वीच या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. एकंदर निवडणुकीचा ज्वर रंगात येत असून सर्वच राजकीय पक्ष तथा इच्छुक उमेदवारांनी लोकांपर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू केली आहे.
याबाबत असे की, अंबाडा जिल्हा परिषद गणाला परिसरातील १५ खेडी जोडली आहेत. अंबाडा हा पंचायत समिती गटदेखील आहे. यालासुद्धा पाच खेडी जोडली आहेत. अमरावती जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यापासून अंबाडा जिल्हा परिषद गण सर्वसाधारण, इतर मागास तथा अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षित राहिले. पण, आजपावेतो अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षित राहिले नाही. अंबाडा पंचायत समिती गटदेखील अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित राहिले नाही. त्यामुळे मार्च २०२२ च्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी अंबाडा जिल्हा परिषद गण तथा पंचायत समिती गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव राहू शकतो, असा शंभर टक्के विश्वास अनुसुचित जातीतील संभाव्य उमेदवरांना तथा राजकीय पक्षाच्या नेत्यांना आहे. त्यामुळे त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
प्रत्येक राजकीय पक्ष अनुसूचित जातीच्या उमेदवारांना सोबत घेऊन पक्षसंघटन वाढवण्यासाठी तथा उमेदवारांची ओळख होण्यासाठी गावागावांतील बूथप्रमुख, शक्तिप्रमुख तथा विविध मेळाव्यांचे आयोजन करीत आहे. कुठे संजय गांधी, श्रावण बाळ निरधार योजना, अपंगांसाठी योजना आदी उपक्रम राबवून लोकांपर्यंत पोहोचत आहे. इच्छुक उमेदवार लग्नसमारंभ, नवयुवकांचे वाढदिवस स्वखर्चाने साजरे करीत आहेत. धार्मिक उत्सवांमध्ये पुढाकार घेताना दिसून येत आहे. अंबाडा जिल्हा परिषद गण तथा पंचायत समिती गट हा अनुसूचित जातीसाठी राखीव राहील, असा अंदाज घेऊन या प्रवर्गातील इच्छुक उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत.