अंबा एक्स्प्रेसला ‘राजधानी’चा लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 10:40 PM2018-05-22T22:40:14+5:302018-05-22T22:40:14+5:30

मुंबई प्रवासासाठी सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या अमरावती-मुंबई अंबा एक्स्प्रेसला राजधानी एक्स्प्रेसचे दिमाखदार स्वरूप लाभणार आहे. निळ्या डब्यांऐवजी लाल डब्यांची (एलबीएच कोच) अंबा एक्स्प्रेस आता धावणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे खा. आनंदराव अडसूळ यांनी अंबा एक्स्प्रेसचे डबे बदलण्यासंदर्भात प्रस्ताव दिला आहे.

Ambaji Express 'Capital' Look | अंबा एक्स्प्रेसला ‘राजधानी’चा लूक

अंबा एक्स्प्रेसला ‘राजधानी’चा लूक

Next
ठळक मुद्देडबे बदलणार, रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मुंबई प्रवासासाठी सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या अमरावती-मुंबई अंबा एक्स्प्रेसला राजधानी एक्स्प्रेसचे दिमाखदार स्वरूप लाभणार आहे. निळ्या डब्यांऐवजी लाल डब्यांची (एलबीएच कोच) अंबा एक्स्प्रेस आता धावणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे खा. आनंदराव अडसूळ यांनी अंबा एक्स्प्रेसचे डबे बदलण्यासंदर्भात प्रस्ताव दिला आहे.
अमरावती-मुंबई एक्स्प्रेस ७ सप्टेंबर २००७ रोजी सुरू झाली. पहिल्या दिवसापासून आजतागायत ही गाडी हाऊसफुल्ल धावत आहे. भुसावळ रेल्वे विभागात सर्वाधिक उत्पन्न देणारी गाडी अशी अंबा एक्स्प्रेसची नोंद रेल्वे विभागाने घेतली आहे. तथापि, या गाडीला १० वर्षे जुने डबे आहेत. उत्पन्नाच्या तुलनेत प्रवाशांना अंबा एक्स्प्रेसने आनंददायी प्रवास करता यावा, यासाठी लाल डबे लावण्याबाबत रेल्वे मंत्र्यांकडे प्रस्ताव खा. अडसूळ यांनी सादर केला आहे. मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसप्रमाणे लाल डबे अंबा एक्स्प्रेसला लागल्यास तिचा लूक बदलेल. हावडा-मुंबई रेल्वे मार्गावर भुसावळ विभागात लाल डबे दुरंतो एक्स्प्रेस, कामाख्या एक्स्प्रेस, इंदूर-यशवंतपूरम् एक्स्प्रेस, पुणे-हटिया एक्स्प्रेस यांना लाल डबे लागले आहेत.
प्रारंभी अंबा एक्स्प्रेसला १८ डबे होते. नंतर डब्यांची संख्या २० झाली. आता ती २४ डब्यांची झाली आहे. खा. अडसुळांनी दिलेल्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाकडून मान्यता मिळाल्यानंतर, मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या महाप्रबंधकांना रेल्वे मंत्री अंबा एक्स्प्रेसला लाल रंगाचे डबे लावण्याबाबत आदेशित करतील, अशी माहिती आहे.
एलबीएच कोचमध्ये आसनक्षमता जास्त
लाल डब्यांची (एलबीएच कोच) आसनक्षमता निळ्या डब्यांपेक्षा जास्त आहे. जुन्या डब्यांची आसन क्षमता ७२, तर लाल डब्यातून ८२ प्रवासी प्रवास करू शकतात. त्यामुळे प्रवाशांसाठी ते सोयीचे ठरणारे आहे. नव्या डब्यांमध्ये एलईडी दिवे, सुसज्ज वातानुकूलन व्यवस्था, प्रशस्त सीट, नव्या आकाराचे शौचालय, आसनानजीक मोबाइल चार्जर आदी अद्ययावत सुविधा असणार आहे.

अंबा एक्स्प्रेस सर्वाधिक उत्पन्न देणारी रेल्वे गाडी आहे. तिचा लूक बदलविणे आणि बदलत्या काळानुसार प्रवाशांना सोईसुुविधा मिळाव्यात, यासाठी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे लाल डबे लावण्यासंदर्भात प्रस्ताव दिला आहे. त्यास लवकरच मान्यता मिळेल.
- आनंदराव अडसूळ, खासदार, अमरावती.

Web Title: Ambaji Express 'Capital' Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.