देशातील पहिल्या क्रीडा अभिमत विद्यापीठाचा मान अंबानगरीला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 11:21 AM2023-03-11T11:21:53+5:302023-03-11T11:23:27+5:30
१०९ वर्षांपूर्वी स्थापित हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला मिळाला सर्वोच्च सन्मान
अमरावती : ‘बलम् उपास्य’ या उदात्त हेतूने अमरावती येथे सन १९१४ स्थापित श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ ‘विश्व बलधर्म’ विद्यापीठ स्थापनेचे ध्येय अविरतपणे जोपासत आहे. भारतीय पारंपरिक खेळासह आधुनिक खेळांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसार व प्रचार करणाऱ्या मंडळाचा राज्य शासनाने सर्वोच्च सन्मान केला आहे. गुरुवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात मंडळाला राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी क्रीडा विद्यापीठाची मान्यता दिल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
देशात अशाप्रकारे पहिलेच अनुदानित खासगी क्रीडा विद्यापीठ असल्याचे मंडळाच्या सचिव माधुरी चेंडके यांनी सांगितले. मंडळाने डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनची सन १९२८ मध्ये स्थापना करून राज्यात प्रथमच विविध खेळांचा अभ्यासक्रमात समावेश केला होता. या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू व प्रशिक्षक यशस्वीरीत्या कार्यरत आहेत.
सन २००७ मध्ये डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन या महाविद्यालयास स्वायत्त (ऑटोनॉमस) दर्जा प्राप्त झाला होता. याला क्रीडा विद्यापीठाचा दर्जा मिळावा, यासाठी मंडळाद्वारे राज्य शासनाला आराखडा सादर केला होता. त्यावर शासनाने एक समिती गठित केली. मंडळाला भेट देत या समितीने माहिती संकलित केली व अहवाल शासनाला सादर केला होता. या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली व अर्थसंकल्पात मंडळाला क्रीडा विद्यापीठाची मान्यता दिल्याचे घोषित केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, कार्याध्यक्ष डॉ. रमेश गोडबोले, उपाध्यक्ष श्रीकांत चेंडके, अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रसाद वाडेगावकर, प्राचार्य उदय मांजरे, श्रीनिवास देशपांडे आदी उपस्थित होते.
क्रीडा विद्यापीठाचे वैशिष्ट्य
क्रीडा विद्यापीठाचा दर्जा मिळाल्याने क्रीडा शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल होणार आहे. सध्या कौशल्यप्रधान व प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी मागणी आहे. याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील. येथील विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र चमूला आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये सहभाग घेता येईल. जागतिक क्रीडा क्षेत्राच्या अनुषंगाने अभ्यासक्रम तयार होणार असल्याचे चेंडके म्हणाल्या.
मंडळाच्या कार्याला शासनाने क्रीडा विद्यापीठाच्या माध्यमातून आता भक्कम अशी ओळख प्राप्त करून दिली आहे. ही अमरावतीकरांची स्वप्नपूर्ती आहे.
- पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, प्रधान सचिव, श्री हव्याप्र मंडळ, अमरावती