‘अंबानाला’ प्रकरणाचा चेंडू ‘पीडब्ल्यूडी’कडे!
By admin | Published: June 21, 2017 12:08 AM2017-06-21T00:08:30+5:302017-06-21T00:08:30+5:30
अंबानाल्यातील काही अनावश्यक पिलर तोडण्याच्या सूचनेवर सभागृहात प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत झाले नाही.
महापालिका सभागृहात निर्णय : हेमंत पवार-चेतन पवारांची जुगलबंदी, आमसभा गाजली
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अंबानाल्यातील काही अनावश्यक पिलर तोडण्याच्या सूचनेवर सभागृहात प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत झाले नाही. त्यामुळे आता याबांधकामाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तपासणी केली जाण्याचे संकेत आहेत. मंगळवारच्या आमसभेत त्याबाबत ठोस निर्णय घेण्यात आला नाही. तत्पूर्वी सभागृहात महापालिका आयुक्त हेमंत पवार आणि बसपाचे गटनेते चेतन पवार यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगले. कंत्राटी अभियंता जीवन सदार यांच्यामुळे हा पेचप्रसंग उद्भवला.
श्री अंबा-एकवीरा देवी विकास आराखड्यांतर्गत अंबानाल्यावरील बांधकामाबाबत १२ जूनला व्हीएनआयटी नागपूरकडून ‘टेक्निकल ओपिनियन’ प्राप्त झाले. स्थायीनंतर हा अहवाल मंगळवारच्या आमसभेत ठेवण्यात आला. अहवालाच्या प्रत ीआणि टिप्पणी सभागृहात वितरित करण्यात आल्यात. मात्र, अंबानाल्यातील काही अनावश्यक पिलर्स पाडण्याची सूचना हेतुपुरस्सर दडविली जात असल्याचा आरोप बसपचे गटनेते चेतन पवार यांनी केला. प्रभारी अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार यांनी व्हीएनआयटीचा अहवाल वाचून दाखविताना सूचनेचा क्रम बदलविला. काही पिलर्स तोडण्याची सूचना व्हीएनआयटीने केली आहे, असे त्यांनी सर्वात शेवटी सांगितले. त्यावर चेतन पवार यांनी आक्षेप घेऊन अहवालातील मुद्दे टिप्पणीत का नाही, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर आयुक्तांनी उत्तरही दिले. मात्र, त्या उत्तराने पवारांचे समाधान झाले नाही. यावेळी सदार आणि पवारांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. पिलर तोडल्यास ‘अप्रोच’ बंद होईल आणि पार्किंगचा हेतू साध्य होणार नाही, अशी बाजू प्रशासनाच्यावतीने सदार यांनी मांडली. त्याचवेळी चुकीचे बांधकामाचा आणि आता ते पाडण्यासाठी येणारा खर्च कुणाकडून वसूल करायचा, असा प्रश्न अजय गोंडाणे यांनी उपस्थित केला. एकंदरीत याविषयावर नगरसेवकांनी सभागृह डोक्यावर घेतल्याने व्हीएनआयटी ही खासगी संस्था आहे. त्यांनी दिलेल्या सूचना अव्यवहार्य नाहीत. मात्र, अचूक तपासणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग पर्याय असू शकतो, अशी भूमिका मांडण्यात आली. ती सूचना पिठासीन सभापतींनी मान्य केली.
११ ते १.३० या अल्प कालावधीत झालेल्या आमसभेत सुरूवातीला मुरूमाचा मुद्दा आक्रमकरित्या हाताळण्यात आला. त्यानंतर एका खासगी कार्यक्रमाला जायचे सांगत आमसभा स्थगित करण्यात आली.
सदारांमुळे नामुष्की!
कंत्राटी आणि प्रभारी अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार यांच्यामुळे आमसभेत प्रशासनाला नामुष्कीला सामोरे जावे लागले. ‘व्हीएनआयटी’च्या वीस पानी अहवालात बिनकामी पिलर्स पाडण्याची सूचना पहिल्या क्रमांकावर आहे. ती सूचना ‘जैसे थे’ न सांगता सदार यांनी पिलर्स पाडण्याची सूचना दडविण्याचा प्रयत्न केला. तथापि चेतन पवार यांच्या आक्रमकतेने तो डाव साध्य झाला नाही. सदारांनी अंबानाला, पांदण रस्ता, असा उल्लेख करून पिलर्स तोडण्याच्या सूचनेला बगल देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
मुरूमातही ‘सदार’च टार्गेट
पावसाळ्यापूर्वी प्रभागनिहाय मुरूम व पाईप पुरविण्यात यावे, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत डवरे, निलिमा काळे यांनी केली. या मुद्यावर सर्वपक्षिय प्रभृती एकत्र आल्या असताना आणि काही नगरसेवकांचा पारा चढल्याने सदार बराच वेळ उत्तर देण्यासाठी पुढे आले नाहीत. यावेळीही सदारांविरूद्ध सभागृहात संताप व्यक्त करण्यात आला. आठ दिवसांत मुरूमाचा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना पिठासीन सभापतींनी दिल्या. मात्र, तत्पूर्वी विरोधी नगरसेवकांनी सदारांची लक्तरे वेशीवर टांगली.