आंबेडकरी साहित्य ग्रामीण माणसाच्या शोषणाचा अंत करणारे; साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

By गणेश वासनिक | Published: February 18, 2024 06:49 PM2024-02-18T18:49:01+5:302024-02-18T18:49:28+5:30

पारंपरिक मराठी साहित्याच्या तथाकथित लेखकाला ग्रामीण माणसाचे दु:ख मांडण्यात फारसे स्वारस्य नव्हते.

Ambedkari Literature Ending Exploitation of Rural Man Grand opening of Sahitya Samela | आंबेडकरी साहित्य ग्रामीण माणसाच्या शोषणाचा अंत करणारे; साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

आंबेडकरी साहित्य ग्रामीण माणसाच्या शोषणाचा अंत करणारे; साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

अमरावती: पारंपरिक मराठी साहित्याच्या तथाकथित लेखकाला ग्रामीण माणसाचे दु:ख मांडण्यात फारसे स्वारस्य नव्हते. त्यांनी मनापासून ग्रामीण मनाचा शोध घेतला नाही. ग्रामीण जीवनाचे चित्रण करणे म्हणजे ग्रामीण साहित्य नसून ग्रामीण माणसाच्या शोषणाचा अंत करू पाहणाऱ्या साहित्यालाच ग्रामीण साहित्य म्हणता येईल. म्हणून आंबेडकरी साहित्यच ग्रामीण माणसाच्या शोषणाचा अंत करेल, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश खरात यांनी केले. देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या पापळ येथे आयोजित पाचव्या आंबेडकरी ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. यावेळी विचार मंचावर उद्घाटक डॉ. वंदना महाजन, अतिथी डॉ. वामन गवई, डॉ. सीमा मेश्राम, स्वागताध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर खडसे आणि महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे उपस्थित होते.

डॉ. प्रकाश खरात म्हणाले, ग्रामीण माणूस व त्याचे जीवन सुखात परिवर्तित करणे हीच खरी साहित्यिकाची लेखनकला होय. ग्रामीण जीवनाची व शोषित मानवी समाजाची पुनर्रचना करणे हेच साहित्याचे कार्य आहे. आंबेडकरी ग्रामीण साहित्याने मानवी मनाच्या व ग्रामीण जीवनाच्या परिवर्तनालाच महत्त्व दिले आहे. म्हणून आंबेडकरी ग्रामीण साहित्य पारंपरिक मराठी ग्रामीण साहित्यापेक्षा निराळे ठरले आहे.

उद्घाटक डॉ. वंदना महाजन म्हणाल्या,सत्ता आणि साहित्य यांचा संबंध असतो. समग्र भूमिका न घेता अलीकडच्या काळात संमेलने घेण्यात येतात, हे साहित्य व्यवहाराच्या दृष्टीने वाईट आहे. जातीचे प्रश्न सुटल्याशिवाय स्त्रियांचे प्रश्न सुटणार नाहीत. हे सत्य पारंपरिक ग्रामीण साहित्यिकांनी स्वीकारून साहित्य निर्मिती केली पाहिजे. आंबेडकरी साहित्यच खऱ्या अर्थाने ग्रामीण माणसाला न्याय देऊ शकते आणि त्यांना प्रतिष्ठा देऊ शकते. अतिथी डॉ. वामन गवई म्हणाले, आंबेडकर ही व्यक्ती नसून जाणीव आहे. त्यामुळेच आंबेडकरी साहित्य हे चळवळीतून आलेलं साहित्य आहे. श्रमिकांच्या दुःखाची मांडणी केवळ आंबेडकरी साहित्यातूनच होऊ शकते. यावेळी स्वागताध्यक्षीय मनोगत प्रा. ज्ञानेश्वर खडसे, महामंडळाची भूमिका डॉ. सीमा मेश्राम, प्रास्ताविक जनार्दन मेश्राम, सदिच्छा संदेश वाचन संजय मोखडे, संचालन अश्विनी गडलिंग यांनी तर आभार बाळू खडसे यांनी मानले.
 
मनुष्यत्वाच्या उत्थानाचा विचार साहित्यातून जोरकसपणे पुढे यावा - प्रशांत वंजारे
अ. भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे म्हणाले, अधिकाधिक लोकांपर्यंत साहित्य जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत साहित्याच्या कक्षा रुंदावणार नाहीत. साहित्य आपल्या दारी ही भूमिका घेऊन ग्रामीण भागात आयोजित होणारे हे संमेलन अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील नवनवीन प्रतिभा या संमेलनाच्या निमित्ताने साहित्यात दाखल होतील आणि एकूणच मराठी साहित्याला नवा आयाम प्राप्त होईल. आंबेडकरी साहित्य हे मूल्यभान असणारे साहित्य असल्याने या साहित्यातून कोणताही माणूस वजा नाही. मनुष्यत्वाच्या उत्थानाचा विचार साहित्यातून जोरकसपणे पुढे आला पाहिजे असे आग्रह सुद्धा त्यांनी यावेळी केला.

Web Title: Ambedkari Literature Ending Exploitation of Rural Man Grand opening of Sahitya Samela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.