आंबिया बहराच्या फळ पीकविम्याची जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:13 AM2021-09-27T04:13:26+5:302021-09-27T04:13:26+5:30
२०२०-२१ मधील १६ हजार लाभार्थी ताटकळत, चांदूर बाजार : जिल्ह्यातील १६ हजार ८१७ शेतकऱ्यांनी आंबिया बहराकरिता फळपीक विमा काढला ...
२०२०-२१ मधील १६ हजार लाभार्थी ताटकळत,
चांदूर बाजार : जिल्ह्यातील १६ हजार ८१७ शेतकऱ्यांनी आंबिया बहराकरिता फळपीक विमा काढला होता. मात्र, आंबिया बहर फळपीक विम्याचे निकष पूर्ण झाल्यानंतरही शेतकऱ्यांना पीकविमा परतावा मिळालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांना केवळ प्रतीक्षा करावी लागत आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळ पीकविमा योजना राज्यात आंबिया व मृग बहराकरिता फळपिकांना लागू करण्यात आली आहे. सन २०२०-२१ वर्षाकरिता या योजनेत जिल्ह्यातील १६ हजार ८१७ शेतकऱ्यांनी १६,२८२ हेक्टरवर आंबिया बहर फळ पीकविमा संत्रा, मोसंबी, केळी या पिकांसाठी काढला होता. या आंबिया बहर फळ पीकविम्याचे निकष व ट्रिगर ३१ मे रोजी संपले. त्यानंतर आता तीन महिने पूर्ण झाले आहेत. असे असतानासुद्धा शासनाने अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पीकविम्याच्या रकमेचे वाटप केले नाही. राज्य व केंद्र शासनाने यामध्ये लक्ष घालून हवामान आधारित फळपीक विमा, गारपीट फळपीक विमा शासनादेशानुसार दरमहा दराने लवकरात लवकर खात्यावर जमा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे केली जात आहे. २०२०-२१ यावर्षी १९ ते २२ मार्च या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या गारपीट व हवामान आधारित फळपीक विमा शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळाला नाही.
----------------
शासनाने आंबिया बहर फळपीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही. कमी पाऊस, विविध रोग-कीड यामुळे फळपीक उत्पादक शेतकरी जेरीस आले आहेत. विमाधारक शेतकऱ्यांचा अंत न पाहता लवकरात लवकर आंबिया फळपीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.
- पुष्पक खापरे, जिल्हास्तरीय शेतकरी पीकविमा प्रतिनिधी, चांदूर बाजार