आंबियाची गळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:06 PM2017-09-25T23:06:24+5:302017-09-25T23:07:04+5:30
यंदाच्या हंगामात बºयापैकी असलेल्या संत्र्याच्या आंबिया बहराची फळगळ मोठ्या प्रमाणावर होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या हंगामात बºयापैकी असलेल्या संत्र्याच्या आंबिया बहराची फळगळ मोठ्या प्रमाणावर होत आहे. यासाठी रसशोषक किडींचा प्रादुर्भाव त्याचप्रमाणे बुरशीजन्य रोग व वातावरणातील बदलदेखील तेवढाच कारणीभूत ठरत आहे. मोठ्या प्रमाणात फळगळ होत असल्याने संत्रा उत्पादकांसमोर संकट उभे ठाकले आहे. यामुळे सरासरी उत्पादनात किमान २५ ते ३० टक्क्यांनी घट येणार असल्याने संत्रा उत्पादकांना कोट्यवधींचा फटका बसणार आहे.
साधारणत: संत्र्याची फळे पक्व होण्याच्या काळात रसशोषक किडींचे मोठ्या आकाराचे व आकर्षक रंगाचे पंतग केवळ रात्रीच्या वेळी कार्यरत असतात. पतंगाचे समोरचे पंख भुरकट रंगाचे असून त्यावर ठिपकेवजा पट्टे असतात, तर मागचे पंख पिवळसर शेंदरी रंगाचे असतात. त्यावर मध्यभागी काळा किंवा अर्धचंद्राकृती काळा ठिपका असतो. हे पंतग संध्याकाळी अर्धकच्चा फळात छिद्र करून रसशोषण करतात. या छिद्रातून रोगजंतूंचा शिरकाव होऊन फळे पिवळी पडत आहेत. याच छिद्रापासून फळे सडण्यास सुरूवात होते. परिणामी कीडग्रस्त फळे गळून पडतात. मृगबहराच्या तुलनेत आंबिया बहराच्या फळांवर म्हणजेच सप्टेंबर व आॅक्टोबर या कालावधीत या किडीचा अधिक प्रभाव दिसून येत आहे.
सध्या दिवसा उष्णतामान अधिक आहे. वातावरणातील बदलासह अन्नाची कमतरता व बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे आंबियाची मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे. बोटिओडीप्लोडिया, कोलिटोट्रिकम व काही प्रमाणात आॅलटरनेटिया या बुरशीमुळेही संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे. या बुरशी देठाद्वारे फळात प्रवेश करून नुकसान करतात. जुन्या वाळलेल्या फांद्या असतील तर रोग अधिक पसरतो.
काळी माशी, मावा, तुडतुडे यांच्या शरीरातून निघालेल्या साखरेसारख्या पदार्थावर बुरशीची वाढ होते व पेशीक्षय होऊन फळगळ होत आहे. संत्र्यांमध्ये शेंडेमर रोगाला कारणीभूत बुरशीचा प्रादुर्भाव पावसाळ्यात होतो. मात्र, याची लक्षणे सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात दिसून येतात. बुरशीच्या प्रादुर्भावामुळे संत्र्याचे देठ व सालीच्या जोडावर काळपट व तपकिरी रंगाचे डाग पडतात. तो भाग कुजून फळांची गळ होते. फायटोप्थोरा याबुरशीच्या प्रादुर्भावामुळे फळकुज रोग दिसून येतो. सद्यस्थितीत या बुरशींचा प्रादुर्भाव संत्र्यावर जाणवत असल्याने संत्रा फळांची गळ सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
पतंगाचे व्यवस्थापन
गळलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. या पतंगाच्या अळ्या संत्रावर्गीय झाडावर जगत नाहीत. त्या बगिचाच्या बाहेरील गुळवेल, वासनवेल, चांदवेल आदी तणांवर जगतात. त्यामुळे या तणांचा नाश करावा.
बगिच्यात सायंकाळी प्रकाश सापळ्याचा वापर करावा व बागेत ओला कचरा जाळून धूर करावा. बागेत विजेचे दिवे लावावेत.
प्रादुर्भाव दिसताच निंबोळी अर्क ५ टक्के (५०० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात) किंवा निंबोळीचे तेल १०० मिली अधिक १० ग्रॅम डिटर्जंट प्रती १० लीटर याप्रमाणात फवारणी करावी.
पतंगाच्या नियंत्रणासाठी १० मिली मॅलॉथिआॅन किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के ई.सी. १० मिली अधिक १०० ग्रॅम गूळ, अधिक १०० मिली फळांचा रस किंवा सिरका (व्हिनेगर) एक लीटर पाण्यात मिसळून तयार केलेले आमिश मोठे तोंड असलेल्या डब्यात घेऊन हे डबे अधून-मधून १० ते १२ या प्रमाणात प्रतीएकर जागेत टांगते ठेवावे, अशी माहिती प्रादेशिक संशोधन केंद्राचे कृषी शास्त्रज्ञ अनिल ठाकरे व राजेंद्र वानखडे यांनी दिली.