इर्विनमधून रुग्णानेच पळविली रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 05:00 AM2020-04-23T05:00:00+5:302020-04-23T05:01:53+5:30
महामार्गावरील वाय पॉइंटजवळ अपघातात जखमी झालेल्या एका इसमाला मंगळवारी बडनेरा पोलिसांनीच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच धर्मेंद्र अभय कथडे (४५, भावसार चौक, चंद्रपूर) याने लॉक तोडल्यानंतर त्याच्याजवळील एका मास्टर चावीने रुग्णवाहिका भरधाव पळविली. जिल्हा सामान्य रुग्णालय ते बडनेरा सिंधी कॅम्प परिसर हे बारा किलोमीटरचे अंतर अवघ्या काही मिनिटांत पार केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णानेच तेथील रुग्णवाहिका बुधवारी सकाळी ७ वाजता पळवून नेली. सुसाट वाहनाला बडनेऱ्यात नागरिकांच्या सतर्कतेने पकडण्यात आले. सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही. विशेष म्हणजे, रुग्णवाहिका पळविणाºया रुग्णाचा एक हात फ्रॅक्चर आहे.
महामार्गावरील वाय पॉइंटजवळ अपघातात जखमी झालेल्या एका इसमाला मंगळवारी बडनेरा पोलिसांनीच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच धर्मेंद्र अभय कथडे (४५, भावसार चौक, चंद्रपूर) याने लॉक तोडल्यानंतर त्याच्याजवळील एका मास्टर चावीने रुग्णवाहिका भरधाव पळविली. जिल्हा सामान्य रुग्णालय ते बडनेरा सिंधी कॅम्प परिसर हे बारा किलोमीटरचे अंतर अवघ्या काही मिनिटांत पार केले. सकाळच्या वेळी बडनेऱ्यात कार्यरत महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना भरधाव रुग्णवाहिका दृष्टीस पडली. हे वाहन एवढ्या वेगाने का जात आहे, हे पाहण्यासाठी काही लोक रुग्णवाहिकेच्या मागोमाग गेले. सिंधी कॅम्प परिसरात प्रकाश गिडवाणी यांच्या घरालगत ही रुग्णवाहिका एका वळणावर थांबली. चालकाच्या अंगात पुरेसे कपडे नव्हते. त्याच्या चेहऱ्याला व हाताला मार लागल्याचे पाहून सदर त्याने ही रूग्णवाहिका चोरल्याचे लक्षात येण्यास नागरिकांना वेळ लागला नाही. त्याला रूग्णवाहिकेतून उतरविल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. बडनेरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर व इतर कर्मचाºयांनी त्याला ताब्यात घेतले. जिल्हा सामान्य रुग्णालय हे सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने सदर रुग्णाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. रुग्णवाहिका पळवून नेणाऱ्या इसमाला पोलिसांनी पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, अशी माहिती आहे. भरधाव रुग्णवाहिकेमुळे दुर्घटना घडली नाही, हे पाहून शहरवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. नगरसेवक प्रकाश बनसोड, स्वास्थ्य निरीक्षक सतीश राठोड, मंगेश गाले, अब्दुल अशफाक, राजू बग्गन, पम्मू असरे, पूनम बग्गन यांसह इतरही महापालिका कर्मचाºयांनी रुग्णवाहिकेचा पाठलाग केला व चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिसांनी जिल्हा शल्यचिकित्सकांशी संवाद साधल्याची माहिती मिळाली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्ण वाऱ्यावर?
जिल्हा सामान्य रुग्णालयाची रुग्णवाहिका पळवून नेणारा धर्मेंद्र कथडे वॉर्ड क्रमांक १५ मध्ये उपचार घेत होता. त्याने रुग्णवाहिका पळवून नेण्यापर्यंत मजल गाठली तरी रुग्णालय प्रशासनाला ही गंभीर बाब लक्षात येऊ नये, यावरून त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहेत. रुग्ण वाºयावर सोडले का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
रुग्णवाहिका पळविणाऱ्याचा एक हात फ्रॅक्चर
अकोला महामार्गावरील वाय पॉइंटवर मंगळवारी चालक असलेला हा रुग्ण जखमी अवस्थेत पडून होता. बडनेरा पोलिसांनीच त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याच्या एका हाताला फ्रॅक्चर असल्याने बँडेज बांधण्यात आले. एका हातानेच त्याने रुग्णवाहिका पळविली. त्याला मूळ गावी जायचे होते. तो काही दिवसांपासून शहरात फिरत होता.