अमडापूरचा पूल संरक्षण भिंतीविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:12 AM2021-01-22T04:12:23+5:302021-01-22T04:12:23+5:30
पुराच्या पाण्याची भीती : राजुरा बाजार : वरूड-राजुरा राज्य महामार्गावर अमडापूर निर्माणाधीन पुलानजीक पूर संरक्षण भिंत न उभारल्यास ...
पुराच्या पाण्याची भीती :
राजुरा बाजार : वरूड-राजुरा राज्य महामार्गावर अमडापूर निर्माणाधीन पुलानजीक पूर संरक्षण भिंत न उभारल्यास अमडापूर गावाला पुराच्या पाण्यापासून धोका होण्याची भीती येथील नागरिकांनी वर्तविली आहे.
अमडापूर -राजुरा चुडामनी नदीवरील राज्य महामार्ग क्र. २४४ वरील अमडापूरच्या जीर्ण झालेल्या पुलाला पर्यायी पूल म्हणून नवीन पुलाचे बांधकाम १० महिन्यांपासून जोमाने सुरू आहे. पुलावरील बांधकाम जवळपास ७० टक्के पूर्णत्वास आले आहे. पावसाळ्यात नदीला आलेले पाणी वाहून जाण्यासाठी लागणारी मार्गिका कमी असल्याने व नदीच्या पात्रात मोठमोठे बीम उभारल्याने चुडामनीचे पात्र अवरुद्ध झाले आहे. नदीच्या अगदी पात्रालागत काठावर असलेला मातीचा थर खसवल्याने पात्रातील पाणी थेट वस्तीत जाण्याची दाट शक्यता आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी नदीलगत निर्माणाधीन पुलावरील नजीकच्या वस्तीला पूर संरक्षण भिंत बांधण्याची मागणी अमडापुर येथील नागरिकांनी केली आहे.
कोट
सदर पुलाचे बांधकाम राज्य महामार्गावर असल्याने वाहतूक जोरात असते. पुलाचे बांधकाम सुरू करण्याअगोदर पूर संरक्षण भिंत बांधणे गरजेचे आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे अधिकारी डोळेझाक करीत आहेत. भविष्यात अप्रिय घटना घडल्यास जबाबदार कोण?
- गिरीश कराळे,
माजी बांधकाम सभापती
जिल्हा परिषद
------------