आमला आरोग्य केंद्रातील रिक्त पदे कधी भरणार?
By admin | Published: March 19, 2017 12:13 AM2017-03-19T00:13:53+5:302017-03-19T00:13:53+5:30
अपेक्षा होमिओ सोसायटींतर्गत आरोग्य सेवांवर आधारित देखरेख व नियोजन समितीची सभा आमला विश्वेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी पार पडली.
सुविधांचा अभाव : आरोग्य देखरेख समितीची बैठक, गैरसोयीचा पाढा
चांदूररेल्वे : अपेक्षा होमिओ सोसायटींतर्गत आरोग्य सेवांवर आधारित देखरेख व नियोजन समितीची सभा आमला विश्वेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी पार पडली. यावेळी उपस्थित सदस्यांनी आरोग्य केंद्रातील रिक्त पदे व ग्रामीण भागातील आरोग्य सेवकांची रिक्त पदे कधी भरणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला. शिवाय आरोग्य केंद्रांमधील अनेक गैरसोयीदेखील उघडकीस आणल्यात.
आरोग्य केंद्रातील बंथ पथदिवे, रस्त्यावरील त्रासदायक ठरणारे शेणखतांचे ढिगारे, औषधींचा अत्यल्प साठा, आरोग्य सेविकांना ड्रेस कोड लागू करणे, आदी मागण्यांची यादी मनू वरठी यांनी संबंधितांना सादर केली.
सोमेश्वर चांदूरकर व रमेश मोठे यांनी सभेतील विषय व त्यांचे महत्त्व उपस्थितांसमोर विशद केले. सभेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य निलिमा होले, सरपंच रजनी मालखेडे, पंकज जगताप, प्रवीण तायवाडे, सुधीर शेळके, तालुका आरोग्य अधिकारी जयस्वाल, वैद्यकीय अधिकारी राहुल उमप आदींची उपस्थिती होती. प्रारंभी आरोग्य केंद्रातील रिक्त पदांबाबत सविस्तर चर्चा झाली. आमला येथील आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानातील प्रसाधनगृहांच्या दुर्दशेचा मुद्दाही यावेळी चर्चेत आला. ग्रामीण नागरिकांना शासनाकडून आरोग्यासाठी पुरविल्या जाणाऱ्या मूलभूत सोयी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातून नियमित प्राप्त होतात किंवा नाही, हे पाहण्यासाठी जनसुविधा देखरेख समितीद्वारे दरवर्षी आढावा घेतला जातो. त्याअंतर्गत ही बैठक घेण्यात आली. प्रास्ताविक रमेश मोंढे यांनी, तर आभार प्रदर्शन मनू वरठी यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)