आंबियाची संत्री मातीमोल

By admin | Published: December 6, 2015 12:10 AM2015-12-06T00:10:34+5:302015-12-06T00:10:34+5:30

संत्र्याचे बऱ्यापैकी उत्पादन झाल्यावरही संत्रा फळाला लागलेली गळती,...

Ammiya's orator Matimol | आंबियाची संत्री मातीमोल

आंबियाची संत्री मातीमोल

Next

संत्रा उत्पादक हवालदिल : १० हजार ४१९ हेक्टरवर संत्राबागा
सुनील देशपांडे अचलपूर
संत्र्याचे बऱ्यापैकी उत्पादन झाल्यावरही संत्रा फळाला लागलेली गळती, तामिळनाडूत झालेला मुसळधार पाऊस, दिल्लीसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब यासह आदी राज्यांत विक्रीला आलेला राजस्थानचा संत्रा, व्यापाऱ्यांनी पाडलेले संत्र्याचे भाव आदी कारणांनी संत्रा उत्पादकांचे आर्थिक नुकसान झाले. अचलपूर तालुक्यात १० हजार ४१९ हेक्टरमध्ये संत्र्याचे पीक घेतले जाते. लहान संत्राफळे तर अक्षरश: रस्त्यावर फेकण्यात आलीत. संत्रा उत्पादकांचे यावर्षी प्रचंड नुकसान झाल्याने येथे संत्रा प्रक्रिया उद्योगाची गरज निर्माण झालेली आहे.
जिल्ह्यात वरूड व मोर्शी तालुक्याची ओळख असली तरी त्या पाठोपाठ अचलपूर तालुक्यातही संत्र्याचे पीक घेतले जाते. ५४,११६ पैकी १०,४१९ हेक्टर क्षेत्र संत्रा पिकाखाली आहे. तालुक्यातील १६,७२० हेक्टरचे सिंचन होत असून ८११३ विहिरीत आहेत. गेल्या काही वर्षांपासून संत्राबागांना वेगवेगळ्या संकटांनी ग्रासले आहेत. भरीसभर तामिळनाडूत पावसाने हाहाकार केल्याने वाहतुकीची कोंडी झाली. संत्र्याची मागणी घटली. दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश, पंजाबसह इतर राज्यात विदर्भातील संत्र्याला मागणी होती. यंदा राजस्थानचा संत्रा दाखल झाल्याने अचलपूर तालुक्यातील संत्र्याचे भाव घसरले. तालुक्यात येणाऱ्या व्यापाऱ्यांनी संत्र्याला कवडीमोल भाव दिल्यामुळे संत्रा उत्पादक हतबल झाला. आज-उद्या भाव मिळेल या आशेवर शेतकऱ्यांचा संत्रा गळू लागला. झाडावर होता त्यालाही आंबिया बहार येण्यासाठी उतरवावे लागले. पडलेला संत्रा विक्री होत नाही. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाशिवाय या भागाचा विकास शक्य नाही, असे दिसत आहे.
अचलपूर तालुक्याचे सिंचनक्षेत्र मोठे आहे. खारपाणपट्ट्यातही थोडीफार जमीन येते. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ६४,६३० हेक्टर आहे. पैकी ५४,११६ हेक्टर जमीन वाहितीखाली आहे. यात ३३ टक्के जमीन मध्यम, तर ३५ टक्के भारी स्वरुपाची आहे. तालुक्याची लोकसंख्या ३ लाख ४ हजार ९७६ एवढी असून खातेदार ९८,९१३ आहेत. सिंचनाच्या मुबलक सुविधा असल्याने मोठ्या प्रमाणात फळपिके घेतली जातात. पपई, केळी, पेरू, संत्रा, आंबा, आवळा, सीताफळ आदींचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो.
यावर्षी अचलपूर तालुक्यावर निसर्गाची अवकृपा झाली. वर्षाच्या सुरुवातीलाच वादळी पावसाचा फटका पिकांना बसला. त्यात प्रामुख्याने केळी सापडली होती. जूनच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली असली, तरी त्यानंतर दडी मारली. अत्यल्प झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेऱ्यात घट झाली. खारपाणपट्ट्यातील काही जमिनीत पेरणी झाली नाही. या वर्षात तालुक्यात २०४३ हेक्टरवर ज्वारी, १६०१२ हेक्टरवर सोयाबीन, १७११० हेक्टरवर कपाशी, ६१२६ हेक्टरमध्ये तूर पिकाची पेरणी करण्यात आली होती.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे पीक घेतले जाते. यावर्षी संत्र्याचे भरघोस पीक येऊनही मागणी नाही. ओलीताच्या सुविधा असल्याने वेगवेगळी पिके घेऊन जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करतात. पण अस्मानी संकटापुढे शेतकरी हवालदिल होत आहे. संत्रा प्रक्रिया उद्योगाशिवाय पर्याय नाही, असे दिसते.

Web Title: Ammiya's orator Matimol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.