धारणी ‘पीओ’त एक कोटींचा हिशेब जुळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:16 PM2018-06-26T22:16:10+5:302018-06-26T22:16:42+5:30
आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत धारणी प्रकल्प (पीओ) कार्यालयाने सन २००९ पासून आजतागायत खर्च केलेल्या निधीचा ताळमेळ जुळत नाही. तब्बल एक कोटी तीन लाखांचे धनादेश दिलेत. परंतु, कॅशबुकमध्ये नोंद नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महालेखाकारांनी याबाबत आक्षेप नोंदविले आहे. विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या पुढ्यातदेखील हा विषय पोहचला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत धारणी प्रकल्प (पीओ) कार्यालयाने सन २००९ पासून आजतागायत खर्च केलेल्या निधीचा ताळमेळ जुळत नाही. तब्बल एक कोटी तीन लाखांचे धनादेश दिलेत. परंतु, कॅशबुकमध्ये नोंद नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महालेखाकारांनी याबाबत आक्षेप नोंदविले आहे. विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या पुढ्यातदेखील हा विषय पोहचला आहे.
जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी योजना, उपक्रम राबविण्याची जबाबदारी धारणी ‘पीओ’कडे आहे. आदिवासी कल्याणासाठी सरकारी योजनांतर्गत आॅईल इंजीन, ईलेक्ट्रिक पंप, गॅसस्टोव्ह, मिरची दळण यंत्र, पिठाची गिरणी, शेवयाचे यंत्र, शिलाई मशीन, दुभते जनावरे वाटपात अपहार झाल्याचे यापूर्वी चौकशीअंती स्पष्ट झाले आहे. तसेच टायपिंग, कॉम्प्युटर, इंग्लिश स्पिकिंग, कौशल्य विकास अशा विविध प्रशिक्षणातून निधीचा अपहार झाला आहे. त्यामुळे धारणी ‘पीओ’ने निधीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी ‘एनजी’द्वारा २०१२ - १५ वर्षात निधीत गैरव्यवहार झाल्याचे आक्षेप नोंदविले आहे. धारणी ‘पीओं’ने सन २००९ राबविलेला योजना, प्रशिक्षणावरील निधीमध्ये अपहार झाल्याचे शासनाने गांर्भियाने घेतले आहे. त्यामुळे अखर्चित निधी, बँकेत शिल्लक, कॅशबुकची तपासणी वेगवान सुरू झाली आहे.
अपर सचिवांचा ठिय्या
लोकलेखा समितीने धारणी ‘पीओ’कडे ५० ते ६० कोटींच्या निधीचे हिशेब जुळत नाही व अखर्चित निधीबाबत आक्षेप आहे. लोकलेखा समितीकडे माहिती पाठवायची होती. मात्र, धारणी ‘पीओ’कडून वस्तुनिष्ठ माहिती मिळाली नाही. त्यामुळे ‘ट्रायबल’चे अपर सचिव सुनील पाटील हे दोन दिवसांपासून अमरावतीत ठिय्या मांडून आहेत.
फाईल्स अमरावतीत
धारणी प्रकल्प कार्यालयाने केलेल्या खर्चाचा हिशेब जुळत नसल्याने येथील अपर आयुक्त कार्यालयात धारणी येथून शेकडो फाईल्स आणल्या आहेत. धारणी व एटीसी कार्यालयाचे कर्मचारी संयुक्तपणे या फाईल्स तपासत आहे. विभागाचे वित्त व लेखाधिकारी प्रवीण इंगळे यांच्या मार्गदर्शनात फाईल्सचे सर्चिंग सुरू आहे.
धारणी ‘पीओं’ची अनियमितता, अखर्चित निधीचा विषय बुधवारच्या लोकलेखा समितीच्या बैठकीत येणार होते. हिशेब मिळाला नाही. हे कारण पुढे करून साक्ष समोर ढकलली.
- आ. सुनील देशमुख
सदस्य, लोकलेखा समिती.