गणवेशाची रक्कम मायलेकांच्या खात्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2017 12:25 AM2017-04-11T00:25:54+5:302017-04-11T00:25:54+5:30
सामाजिक व आर्थिक मागास असलेल्या विद्यार्थ्यांना यापूर्वी शासनाकडून मोफत गणवेश दिले जात होते.
बँक खाते उघडण्याची लगबग: गुरूजींवर सोपविली जबाबदारी
अमरावती : सामाजिक व आर्थिक मागास असलेल्या विद्यार्थ्यांना यापूर्वी शासनाकडून मोफत गणवेश दिले जात होते. मात्र यावर्षीपासून गणेवशाची रक्कम थेट खात्यात जमा केली जाणार आहे. त्याकरिता मायलेकांचे संयुक्त बँक खाते असणे अनिवार्य करण्यात आले आहे. खाते काढण्याची जबाबदारी गुरुजींवर सोपविण्यात आली आहे.
शाळा व्यवस्थापन समितीमार्फत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपाची प्रक्रिया राबविली जायची. परंतु या प्रक्रियेला येत्या शैक्षणिक सत्रापासून फाटा देण्यात आला आहे. त्यासाठी गणेवशाचे ४०० रुपये मायलेकांचे संयुक्त बॅक खाते काढण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. शाळा व्यवस्थापन समितीकडून गवणेश वाटपात गैरप्रकार व्हायचा, याबाबतच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे शासनाने गणेवश वाटपातील भष्ट्राचार संपविण्यासाठी थेट बँक खात्यात रक्कम जमा हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गिय मुले व सर्व मुलींना मोफत गणवेश वाटप केले जाते. एका विद्यार्थ्यांना प्रतिगणवेश २०० रुपये याप्रमाणे दोन गणवेशांचे ४०० रुपये खात्यात जमा होणार आहे. एकही पात्र विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षकांवर गणवेशाची रक्कम सदर विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत. यापूर्वी गणवेश खरेदी करुन ते शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वाटप केले जात आहे. शासनाकडून येणारा निधी हा जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे यायचा. त्यानंतर ही रक्कम शालेय शिक्षण समितीच्या खात्यावर वर्ग केले जात होते. मात्र सन २०१७-१८ या शैक्षणिक सत्रापासून अन्य योजनांप्रमाणे गणवेशाची रक्कमही विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. गणवेशाची रक्कम जमा होण्यासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते हे वडिलांच्या नव्हे, तर आईच्या नावे संयुक्त असणे अनिवार्य आहे. गणवेश खरेदी केल्यानंतर पावती दाखविल्यास सदर रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. मे महिन्यापासून या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या गणवेशाची रक्कम जमा करता यावी, यासाठी शासनाने शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला बँक खाते उघडण्याबातची कार्यवाही करण्याचे आदेशीत केले आहे. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना पत्र पाठवून गणवेशाची रक्कम जमा करण्यासाठी झिरो बॅलेन्सचे बॅक खाते उघडण्याबाबतचे कळविले आहे. ज्या विद्यार्थ्यांची आई हयात नसेल अशा विद्यार्थ्यांचे खाते हे वडील किंवा पाल्यांच्या संयुक्त नावे काढण्यात यावे, अशा सूचना देण्यात आला आहेत. गणवेश खरेदीनंतरच पावती दाखविताच विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. (प्रतिनिधी)
गणवेश खरेदीसाठी अगोदर पैसे आणावे कोठून ?
जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये गोर- गरीब विद्यार्थी बहुसंख्यने आहेत. बॅक खात्यात थेट अनुदान हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. मात्र गणवेश खरेदीसाठी अगोदर रक्कम आणावी कोठून हा खरा सवाल उपस्थित झाला आहे. बँ खाते हे झिरो बॅलेन्सने सुरु करणार असले तरी खात्यात कमीत कमी रक्कम ठेवण्याचे निर्देश बॅकांचे आहेत. त्यामुळे जाचक अटींमुळे बॅकेतून गणवेशाचे ४०० रुपये रक्कम काढताना अनंत अडचणींच्या सामोरे जावे लागणार आहे.