Amravati: आठ संवर्गाच्या रिक्त जागांसाठी ४९१४ उमेदवार देणार परीक्षा, जिल्हा परिषदेने दिली माहिती
By जितेंद्र दखने | Published: October 6, 2023 07:29 PM2023-10-06T19:29:29+5:302023-10-06T19:29:48+5:30
Amravati: अमरावती जिल्हा परिषदेत विविध संवर्गात रिक्त असलेल्या ६५३ पदांसाठी पदभरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
- जितेंद्र दखने
अमरावती - जिल्हा परिषदेत विविध संवर्गात रिक्त असलेल्या ६५३ पदांसाठी पदभरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यानुसार, शनिवार ७ ते ११ ऑक्टोबर यादरम्यान रिक्त पदाकरिता शहरातील ९ परीक्षा केंद्रांवर वेळापत्रकानुसार अमरावती जिल्हा परिषदमधील सहा संवर्गातील रिक्त असलेल्या १४ पदांसाठी पहिल्या टप्प्यात आयबीपीएस कंपनीमार्फत ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे.
या परीक्षेला चार दिवसात ४ हजार ९१४ परीक्षार्थी सामोरे जाणार आहेत.जिल्हा परिषदेत रिक्त असलेल्या विविध संवर्गातील सरळसेवेच्या ६५३ रिक्त असलेल्या पदांसाठी ५ ते २५ ऑगस्ट या कालावधीत पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. यानुसार आता या पदांसाठी शनिवार, ७ ते ११ ऑक्टोबर अशा चार दिवस चालणाऱ्या ऑनलाइन परीक्षेसाठी परीक्षार्थीच्या संख्येनुसार प्रत्येक दिवसनिहाय एकूण ९ परीक्षा केंद्र निश्चित केले आहेत. जिल्हा परिषदेतील रिक्त पदांसाठी होत असलेली भरतीप्रक्रिया ही आयबीपीएस या खासगी कंपनीमार्फत ऑनलाइन घेतली जाणार आहे.
अशी होणार परीक्षा
७ ऑक्टोबर रोजी रिंगमन, वरिष्ठ सहायक लेखा- दोन पदासाठी परीक्षा केंद्रावर ५३७ उमेदवार परीक्षा देणार आहेत. तर विस्तार अधिकारी सांख्यिकी या पदासाठी ८ ऑक्टोबरला शहरातील ९ परीक्षा केंद्रांवर सुमारे २ हजार ३८ उमेदवार परीक्षा देतील. १० ऑक़्टोबर रोजी विस्तार अधिकारी कृषी व आरोग्य पर्यवेक्षक या पदाकरिता ७ परीक्षा केंद्र निश्चित केले आहेत. या ठिकाणी दोन सत्रामध्ये सुमारे १ हजार १५० परीक्षार्थी आहेत. तर ११ ऑक़्टोबरला लघुलेखा निम्नश्रेणी, लघुलेखक उच्चश्रेणी व कनिष्ठ सहायक लेखा या पदांसाठी १ हजार १८९ परीक्षार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहे. याकरिता पाच परीक्षा केंद्र निश्चित केली असून, तीन सत्रामध्ये परीक्षा घेतली जाणार आहे.
परीक्षा केंद्रांची सीईओंकडून पाहणी
जिल्हा परिषदेतील सरळसेवेच्या रिक्त असलेल्या ६५३ पदांसाठी पहिल्या टप्प्यात शनिवारपासून ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. याकरिता एकूण ९ परीक्षा केंद्र निश्चित केले आहेत. या परीक्षेच्या पूर्वसंध्येला अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, परिवीक्षाधीन अधिकारी भाप्रसे अनुकुरी नरेश, जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे आदी अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षेच्या तयारीची पाहणी केली.