२६ जानेवारीपासून अमरावती, अचलपूर आॅनलाईन !
By admin | Published: January 24, 2016 12:18 AM2016-01-24T00:18:28+5:302016-01-24T00:18:28+5:30
राज्यात सेवा हमी कायद्यांतर्गत नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधा येत्या प्रजासत्ताक दिनापासून आॅनलाईन स्वरुपात उपलब्ध होणार आहे.
महापालिकेतर्फे प्रयत्न : अचलपूर पालिकेपुढे आव्हान
प्रदीप भाकरे अमरावती
राज्यात सेवा हमी कायद्यांतर्गत नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधा येत्या प्रजासत्ताक दिनापासून आॅनलाईन स्वरुपात उपलब्ध होणार आहे. राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांनी त्या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
अमरावती महापालिकेतर्फेही त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत असून अधिसूचित करण्यात आलेल्या सेवा आॅनलाईन उपलब्ध करून देण्यासाठीची तयारी केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह राज्य सरकारतर्फे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा निश्चित कालावधीत मिळाव्या, यासाठी सरकारने सेवा हमी कायदा लागू केला. विविध प्रकारच्या सेवा आणि त्यासाठी अपेक्षित कालावधी सरकारने निश्चित केला आहे. सर्व सेवा प्रजासत्ताक दिनापासून आॅनलाईन स्वरुपात नागरिकांना उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश सरकारने दिले आहेत. दोन महिन्यांपूर्वी नगरविकास खात्याच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्याचे सुतोवाच करण्यात आले होते. त्यानुसार सर्व महापालिका आणि नगरपालिकांना नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.