अमरावतीची भेंडी होणार आखाती देशात निर्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 07:37 PM2018-05-30T19:37:14+5:302018-05-30T19:37:14+5:30
शेतातून थेट वाहनाद्वारे नागपूर विमानतळावर पोहचविण्यात येईल.
अनिल कडू/परतवाडा : अमरावतीच्या अचलपूर येथील भेंडी आता आखाती देशांमध्ये निर्यात केली जाणार आहे. त्यामुळे आता या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट होण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी शेतातून तोडलेली भेंडी बहारिन येथे विमानाने पाठवण्यात येईल. त्यानंतर ती लगेचच स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध होईल.
ईवा नामक निर्यातदार कंपनी ही भेंडी बहारिनमध्ये पाठवणार आहे. ईवाचे संदीप चव्हाण, कृषी समृद्धी उत्पादक कंपनीचे रविकिरण पाटील, अचलपूरचे युवा शेतकरी रितेश पोटे, रुपेश उल्हे, राहुल ठाकरे, आशिष पोटे, वसंत सातरोटे, प्रवीण केदार, राहुल रेखाते यांच्या प्रयत्नातून जिल्हाधिकारी अभिजित बांगर, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांच्या मार्गदर्शनात हा पहिलाच प्रयोग राबविण्यात येत आहे.
अचलपूर तालुक्यातील १६ शेतकरी भेंडी निर्यात करणार आहेत. आठवड्यातून पाच दिवस उपलब्धतेनुसार दररोज पाचशे ते हजार किलो भेंडी पाच-पाच किलोच्या बॉक्समध्ये शेतकºयांच्या शेतावरच पॅक केली जाणार आहे. शेतातून थेट वाहनाद्वारे नागपूर विमानतळावर पोहचविण्यात येईल. सायंकाळी ५.३० च्या विमानाने ती त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता बहरिनच्या मार्केटमध्ये दाखल होणार आहे.
अचलपूरची ही भेंडी खाण्यायोग्य असून, आवश्यक सर्व चाचण्यांमध्ये ती उत्तीर्ण झाली आहे. गुरूवार ३१ मे रोजी अचलपूर शहरातील बीलनपुरा निवासी ललित शामराव कपले यांच्या शेतातील भेंडी निर्यात केली जाणार आहे. शेतकºयाला शेतातच २५ रुपये किलोप्रमाणे भेंडीचा भाव दिला जाणार आहे. यात अमरावती जिल्हा फळे व निर्यातदार संघाची भूमिका महत्त्वाची आहे. यात या पहिल्याच उपक्रमातून पाठविल्या जाणाºया भेंडीच्या वाहनाला जिल्हाधिकारी अभिजित बांगर, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखविणार आहेत.