अमरावती, अकोला जिल्ह्यात सर्वाधिक कर्करुग्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 10:27 PM2019-02-08T22:27:01+5:302019-02-08T22:27:38+5:30
अमरावतीत सर्वाधिक त्या खालोखाल अकोला जिल्ह्यातून कर्करोगाचे रुग्ण येत असल्याचा नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा अहवाल आहे. गुटखा व खर्रा याबाबतची व्यसनाधीनताच त्यामागील मुख्य कारण आहे. त्यामुळे अवैध गुटख्याविरुद्ध पोलीस व एफडीएंनी धडक मोहीम राबवावी, असे निर्देश आमदार सुनील देशमुख यांनी शुक्रवारी येथे दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावतीत सर्वाधिक त्या खालोखाल अकोला जिल्ह्यातून कर्करोगाचे रुग्ण येत असल्याचा नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा अहवाल आहे. गुटखा व खर्रा याबाबतची व्यसनाधीनताच त्यामागील मुख्य कारण आहे. त्यामुळे अवैध गुटख्याविरुद्ध पोलीस व एफडीएंनी धडक मोहीम राबवावी, असे निर्देश आमदार सुनील देशमुख यांनी शुक्रवारी येथे दिले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, आरडीसी नितीन व्यवहारे, अन्न व औषध विभागाचे अधिकारी एस.डी. केदारे, बी.के. चव्हाण आदी उपस्थित होते.
अमरावती व अकोला जिल्ह्यातून अचानक कर्करुग्ण वाढल्याबाबत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यात घशाचा व अन्ननलिकेचा कर्करुग्णांचा समावेश आहे. तरुण या व्यसनाच्या जाळ्यात अडकल्यामुळे पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक मोहीम राबवावी, असे आ. देशमुख म्हणाले.
गतवर्षी १७ हजार ३४८ नागरिकांची कक्षाला भेट
जिल्ह्यात १६ तंबाखू नियंत्रण कक्ष असून, गत वर्षांत १७ हजार ३४८ तंबाखू खाणाºया नागरिकांनी कक्षाला भेट दिली. त्यातील १ हजार ६३२ नागरिकांनी तंबाखूचे व्यसन सोडले, अशी माहिती डॉ. निकम यांनी दिली. व्यसनमुक्तीसाठीच्या उपक्रमांचे यशापयश तपासण्यासाठी वर्षनिहाय तपशीलवार आकडेवारी, व्यसनमुक्त व्यक्तींच्या याद्या आदी माहिती सादर करणे आवश्यक असल्याचे सुनील देशमुख म्हणाले.
गोदाम रखवालदार नव्हे, रॅकेटपर्यंत पोहचा
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता गुटखा विक्रेत्याविरुद्ध भारतीय दंडसंहितेतील कलम ३२८ नुसार अजामीनपात्र गुन्हा दाखल होतो. त्याचा काहिसा धाक निर्माण झाल्याचे केदारे म्हणाले. त्याबाबत आ. देशमुख म्हणाले की, गुटखाबंदीच्या कारवाईत केवळ गोदाम रखवालदारांना पकडून उपयोग नाही. गुटखा रॅकेट कोण चालवते, ते तपासून त्याच्या मुळापर्यंत गेले पाहिजे. धाड टाकल्यावर आरोपीला सुटण्याची संधी मिळता कामा नये. गुन्हे दाखल झाल्यावर गुन्हे सिद्ध होण्याचेही प्रमाण वाढले पाहिजे.
बनावट गुटखा निर्मितीला प्रतिबंध घाला
शहरात बनावट गुटख्याची निर्मिती होत असल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणावर येत आहेत. सडक्या सुपारीला केमिकल लावून असा गुटखा इंदूरहून पाऊच मागवून पॅक होतो. त्यासाठीचे मशीन एक ते दीड लाख रुपयांत मिळत असल्याने अनेक ठिकाणी तो तयार होतो व सर्रास विकला जातो, अशी तक्रार आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार असून, तो वेळीच रोखला पाहिजे, ही बाब आ. देशमुख यांनी अधिकाºयांच्या लक्षात आणून दिली.