महाराष्ट्रात अमरावती, अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 03:28 PM2019-04-05T15:28:51+5:302019-04-05T15:36:39+5:30
मध्यप्रदेश, गुजरात व राजस्थानवर उष्णतेची लाट असल्यामुळे तेथून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे अमरावती व अकोल्यातील तापमानात वाढ झाली आहे.
अमरावती - मध्यप्रदेश, गुजरात व राजस्थानवर उष्णतेची लाट असल्यामुळे तेथून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे अमरावती व अकोल्यातील तापमानात वाढ झाली आहे. गुरुवारी (4 एप्रिल) महाराष्ट्रातील अन्य शहरांच्या तुलनेत अकोला व अमरावतीत सर्वाधिक तापमानांची नोंद झाली आहे. अमरावतीत ४३.८, तर अकोल्यात ४४ डिग्री सेल्सिअस तापमान आहे.
शुक्रवारनंतर उष्णतेची लाट ओसरणार असून, पश्चिम विदर्भ ते मध्य महाराष्ट्र, कर्नाटकपर्यंत कमी दाबाच्या स्थितीमुळे पूर्व विदर्भात शुक्रवारी वादळी पावसाची शक्यता आहे. शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार, सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यात पश्चिमेकडून वारे वाहत आहे. उष्ण वाऱ्यामुळे अमरावतीच्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. बुधवारी अमरावतीत ४३.८ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारीही तीच नोंद कायम राहिली. शुक्रवारनंतर उष्णतेची लाट ओसरणार असून, कमाल तापमान थोडे कमी होण्याची शक्यता आहे.
बुधवारी अमरावतीत ४३.८ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारी राज्याच्या तुलनेत अकोला व अमरावतीत सर्वाधिक तापमान होते. शुक्रवारनंतर उष्णतेची लाट ओसरणार आहे.
- अनिल बंड, हवामानतज्ज्ञ
असे आहे गुरुवारचे तापमान
अकोला ४४.०
अमरावती ४३.८
बुलडाणा ४१.२
ब्रम्हपुरी ४१.७
गडचिरोली ४०.२
गोंदीया ४०.०
नागपूर ४१.२
वर्धा ४३.०
यवतमाळ ४२.०
विदर्भात पाऊस
शुक्रवार, शनिवारी विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात अधिक शक्यता आहे. कमाल तापमानात घट होईल. पुढील पाच सहा दिवस कमाल तापमान ४२ ते ४३.५ अंशाच्या आसपास राहील. १० एप्रिलपर्यंत पुन्हा विदर्भात पावसाची शक्यता आहे.
यंदाचा उन्हाळा असणार अधिक कडक : सरासरी ०़ ५ अंशाने तापमान वाढण्याची शक्यता
यंदा एप्रिल ते जून या हंगामात मध्य भारत आणि उत्तरपश्चिम भारतात सरासरीपेक्षा ०़५ अंशाने वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिम राजस्थानमध्ये हंगामातील सरासरीपेक्षा १ अंशाने तापमान जास्त असल्याची शक्यता आहे़. तसेच उष्ण झोनमध्ये तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशची किनारपट्टी या हवामानविभागाच्या उपविभागात उष्णतेची लाट येण्याची ४४ टक्के शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशातील बहुतांश भागात उमेदवारांना प्रचार करताना कडक उन्हाचा सामना करावा लागला आहे.