आश्रमशाळांचे शिक्षक २५००; परीक्षेला बसले फक्त २५, घातला सामूहिक बहिष्कार
By सुनील काकडे | Published: September 18, 2023 03:21 PM2023-09-18T15:21:13+5:302023-09-18T15:22:42+5:30
अमरावती विभागात क्षमता परीक्षेची वाताहात
सुनील काकडे, वाशिम : आदिवासी विकास विभागाकडून शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षकांची क्षमता परीक्षा १७ सप्टेंबर रोजी घेण्यात आली; मात्र ठरल्यानुसार अमरावती विभागातील संबंधित शिक्षकांनी परीक्षेवर सामुहिक बहिष्कार टाकून परीक्षा दिली नाही. कार्यरत २५ शिक्षकांपैकी केवळ कंत्राटी तत्वावर नियुक्त २५ शिक्षकांनीच परीक्षा दिल्याची माहिती प्राप्त झाली.
राज्यभरात ५९६ शासकीय आणि ५५६ अनुदानित अशा एकूण १ हजार १५२ आश्रमशाळा आहेत. त्यावर सुमारे १२००० शिक्षक कार्यरत आहेत. त्यातील अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये २५०० शिक्षकांचा समावेश असून शिकविण्याशी संबंध नसलेल्या विषयाची एकत्रित प्रश्नपत्रिका काढून परीक्षा घेतली जात आहे. आश्रमशाळांवरील शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण व बदनामी करण्याचा हा प्रकार असल्याचा मुद्दा समोर करून आश्रमशाळांच्या शिक्षकांनी क्षमता परीक्षेवर सामूहिक बहिष्कार टाकत असल्याचे शासनाला कळविले होते.
घेतलेल्या निर्णयावर ठाम राहत या शिक्षकांनी १७ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेकडे सपशेल पाठ फिरवली. अमरावती विभागात कार्यरत २५०० पैकी केवळ २५, ते ही कंत्राटी तत्वावर कार्यरत शिक्षकांनीच परीक्षा दिल्याची माहिती प्राप्त झाली.
आश्रमशाळांवरील शिक्षकांचे शासनस्तरावर प्रलंबित असलेले प्रश्न निकाली काढण्याची मागणी आपण आदिवासी विकास मंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांच्याकडे केली होती. शिक्षकांनी बहिष्कार घातल्याने नियोजित शिक्षक क्षमता परीक्षा रद्द करण्यात यावी, असेही कळविले होते; मात्र दखल घेण्यात आली नाही.
- शेखर भोयर, अध्यक्ष, शिक्षक महासंघ