Amravati: मचाणीखाली अस्वलीचा ठिय्या...मग झोपच पळाली!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 10:42 PM2024-05-25T22:42:32+5:302024-05-25T22:43:04+5:30
Amravati News: बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण रात्र जंगलातील थरार अनुभवण्याची संधी यंदाही उपलब्ध करून देण्यात आली. परिवारासह २३ मेच्या रात्री ‘निसर्ग अनुभव’ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पारस (जि. अकोला) येथून सेमाडोहला आलेल्या रिदम हिने २० मिनिटे अगदी मचानाखालीच अस्वलींचा थरार अनुभवला.
- मनीष तसरे
अमरावती - बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण रात्र जंगलातील थरार अनुभवण्याची संधी यंदाही उपलब्ध करून देण्यात आली. परिवारासह २३ मेच्या रात्री ‘निसर्ग अनुभव’ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पारस (जि. अकोला) येथून सेमाडोहला आलेल्या रिदम हिने २० मिनिटे अगदी मचानाखालीच अस्वलींचा थरार अनुभवला. जणू आपण दुसरा दिवस पाहू ताे की नाही, असेच तिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत २३ मे रोजी निसर्गानुभव उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत मचाण बुकिंगची सुविधा ‘मॅजिक मेळघाट डॉट इन’ या संकेतस्थळावर उपलब्ध होती. या निसर्गानुभव कार्यक्रमासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत १२८ मचाणी उपलब्ध होत्या. या मचाणीवरून बुद्ध पौर्णिमेच्या लखलखत्या प्रकाशात निसर्ग सौंदर्यासोबतच विविध प्राणी पाहणे आणि त्याची मोजदाद करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, ढगाळ वातावरणामुळे यंदा अनेकांचा हिरमाेड झाला.
अस्वलीचा थरार
पारस येथून आलेल्या चांडक परिवाराने वेगवेगळ्या मचाण बुक केल्या होत्या. सेमाडोह येथील संकुलातून चारच्या सुमारास सर्वांना मचाणवर सोडण्यात आले. मेळघाटातील वाघाचे दर्शन व्हावे, हीच इच्छा घेऊन सर्वच जण मेळघाटमध्ये येतात. रिदम पहिल्यांदाच मेळघाटात निसर्गानुभव घेण्यासाठी आली होती. जवळपास ५ वाजेच्या सुमारास मचाणवर पोहोचल्यावर गाइडच्या परवानगीशिवाय खाली उतरण्यास परवानगी नव्हती. रात्रीच्या सव्वा अकरा वाजेच्या सुमारास जोरात आवाज आला. सुरुवातीला कळलेच नाही की तो आवाज नेमका कशाचा? आईसोबत असल्याने मी आईला जागवले. ती म्हणाली कुणीतरी प्राणी शिकारीसाठी आले आहे. त्यामुळे आम्ही गाइडला विचारले तर त्यांनी सांगितले की दोन अस्वली भांडत आहेत. काही वेळाने त्या निघून गेल्या. मात्र, पुन्हा पावणे दोनच्या सुमारास पुन्हा एक अस्वल आली आणि ती नेमकी अगदी मचाणच्या खाली बराच वेळ बसून राहली. त्यावेळी असे वाटत होत की ही जर वर चढली तर आपले काय होणार? त्या भीतीपोटी आम्ही जराही हालचाल करणे टाळले. अगदी त्या वेळेेला विचार आला हिने जर आमच्यावर हल्ला केला तर आपण उद्याचा दिवसच पाहणार नाही. मात्र काही वेळाने जोराने आवाज करून ती निघून गेली. जाताना पुन्हा वळून पाहिले आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला.
वाघ जरी दिसला नाही तरी निसर्गाचा अनुभव हा सुंदर होता. वन्यप्राण्यांकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्या शिकायला हव्यात असे निसर्गानुभव घेण्याकरिता आलेल्या प्राणीप्रेमींनी सांगितले. आमच्या जंगलात जसे प्लास्टिक कुठेच आढळत नाही. तसेच आपणसुध्दा शहरात प्लास्टिक टाळायला हवे, ही सुरुवात स्वत:पासून करायला हवी. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सेमाडोह क्षेत्रातून येणाऱ्या पर्यटकांना दुपारी तीनच्या सुमारास ठरवून देण्यात आलेल्या मचाणवर सोडण्यात आले. त्यासोबत त्यांना फूडपॅकसुध्दा देण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन नवरे, प्रदीप बाळापुरे, वनरक्षक गुलाब धांडे, मंगेश घोंगळे, शुभम नेसनेसकर, राधिका पोहेकर, वनपाल बाबूराव खैरकार, अविनाश मते, संदीप लवगे, गाइड भोला मावस्कर यांनी व्यवस्था सांभाळली.