धारणी तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 07:57 PM2018-09-06T19:57:42+5:302018-09-06T19:58:01+5:30

धारणी तालुक्यातील कुसुमकोट फाट्यावर एका तलाठ्यासह कोतवालाला रेती वाहतूकदाराकडून नऊ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

Amravati bribe News | धारणी तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात 

धारणी तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात 

googlenewsNext

अमरावती - धारणी तालुक्यातील कुसुमकोट फाट्यावर एका तलाठ्यासह कोतवालाला रेती वाहतूकदाराकडून नऊ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी केली. 
साद्राबाडी आणि झिलपी परिसरात रात्री नदी-नाल्यातून अवैध रेती वाहतुकीसाठी आदिवासी ट्रॅक्टरमालकाकडून नऊ हजारांची लाच घेताना कुसुमकोट फाट्यावर धारणी येथील तलाठी देवेंद्र गजबलाल फूलमाली (४९) आणि कोतवाल दिनेश धांडे (३१) यांना अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गजाआड केले. त्यांनी तक्रारदार रेती वाहतूकदाराला ३० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. यानंतर २५ हजारांवर त्यांच्यात तडजोड झाली. यापैकी १४ हजार रुपये दिल्यानंतर उर्वरित नऊ हजारांसाठी तक्रारदाराच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता. यामध्ये हे दोघे अलगद अडकले. 
धारणी तालुक्यात एक वर्षापासून रेतीघाटांचा लिलाव नाही. तरीही शासकीय व निमशासकीय बांधकामांवर तसेच खासगी बांधकामांसाठी रेतीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. महसूल प्रशासनाचा ‘आशीर्वाद’ असल्याने रेती वाहतूकदार रेतीघाटातून मोठ्या प्रमाणात उपसा करीत आहेत. त्यामुळे नदीपात्रात रेतीसाठा काहीच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रेती वाहतूकदारांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन आपले खिसे भरणाºया अधिकाºयांविरोधात हे रेती वाहतूकदार एसीबीला तक्रार करताना दिसून येत आहे. 
कारवाई पथकात एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन, पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम बारड, चंद्रशेखर दहीकर, श्रीकृष्ण तालन, अभय वाघ, चंद्रकांत जनबंधू यांचा समावेश होता. 

एका महिन्यात दुसरी कारवाई 
एक महिन्यातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धारणीत दुसरी कारवाई केली. यापूर्वी लाचखोर पोलिसाला दोन हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले होते.

Web Title: Amravati bribe News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.