Amravati: लाचखोर सरपंचासह पतीला अटक, एसीबीची बिजुधावडी येथे कारवाई
By प्रदीप भाकरे | Published: May 20, 2024 09:41 PM2024-05-20T21:41:02+5:302024-05-20T21:42:26+5:30
Amravati: राहणीमान भत्त्याच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अढाव ग्रामपंचायतीच्या सरपंचासह त्यांच्या पतीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई सोमवार, २० मे रोजी दुपारी बिजुधावडी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेसमोर करण्यात आली.
- प्रदीप भाकरे
अमरावती : राहणीमान भत्त्याच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अढाव ग्रामपंचायतीच्या सरपंचासह त्यांच्या पतीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई सोमवार, २० मे रोजी दुपारी बिजुधावडी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेसमोर करण्यात आली. जसमाय छोटेलाल मावस्कर (३८) व छोटेलाल सोनाजी मावस्कर (४२) दोघेही रा. अढाव असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर सरपंच व त्यांच्या पतीचे नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदार यांना २०२० पासून राहणीमान भत्ता मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांनी राहणीमान भत्ता मिळण्याकरिता २ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदार हे राहणीमान भत्त्याच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी सरपंच जसमाय मावस्कर यांच्याकडे गेले. त्यावेळी सरपंच जसमाय मावस्कर यांनी त्यांना धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या संदर्भात तक्रारदार यांनी १६ मे रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने १७ मे रोजी पडताळणी करण्यात आली.
पडताळणीत सरपंच जसमाय मावस्कर यांनी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सोमवारी दुपारी सापळा रचण्यात आला. बिजुधावडी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेसमोर तक्रारदार यांच्याकडून तडजोडीअंती मागणी केलेली २० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच सरपंच जसमाय मावस्कर व त्यांचे पती छोटेलाल मावस्कर यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. त्यांच्याविरुद्ध धारणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे व सतीश उमरे, प्रमोद रायपुरे, विद्या राऊत, शैलेश कडू, बारबुद्धे यांनी केली.