अमरावतीमध्य रेल्वेला भंगारातून मिळाले ४५.२९ कोटी
By गणेश वासनिक | Published: June 13, 2023 05:14 PM2023-06-13T17:14:13+5:302023-06-13T17:14:45+5:30
एप्रिल व मे दोन महिन्यात भंगाराची विल्हेवाट, ‘झिरो स्क्रॅप मिशन’ अंतर्गत ई-निविदाद्वारे प्रक्रिया
अमरावती : मध्य रेल्वे मुंबई विभागाने ‘झिरो स्क्रॅप मिशन’ अंतर्गत ई निविदाद्वारे प्रक्रिया राबविली. यात एप्रिल व मे २०२३ या दोन महिन्यात भंगाराची विल्हेवाट लावताना मध्य रेल्वे प्रशासनाला ४५.२९ कोटींचा महसृल मिळाला आहे. रेल्वेचा प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री केल्यानंतरच भंगार विक्री झाल्याची माहिती आहे.
मे महिन्यात भंगार विक्रीतून २२.६९ कोटी तर त्यानुसार आतापर्यंतची एकत्रित विक्रीतून ४५.२९ कोटींचा महसूल मिळाला आहे. ही रक्कम मे २०२३ पर्यंतच्या समानुपातिक उद्दिष्टापेक्षा १३.२३ टक्के जास्त आहे. वार्षिक उद्दिष्ट ३०० कोटी आहे. भंगारची विक्री मध्य रेल्वेच्या मुंबई (माटुंगा कार्यशाळा), पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर येथे विविध ठिकाणी करण्यात आली आहे.
विकल्या जाणाऱ्या भंगाराच्या प्रमुख वस्तूंमध्ये ईएमयू कोच, आयसीएफ कोच, लोकोमोटिव्ह, वॅगन्स आणि इतर भंगाराचा समावेश हाेता. ‘झिरो स्क्रॅप मिशन’ चा एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या सर्व विभाग, कार्यशाळा, शेड आणि विविध डेपोवर भंगार विक्रीचा उपक्रम हाती घेतला जात असल्याची माहिती भुसावळ येथील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.