अमरावती-चांदूर रेल्वे राज्य महामार्ग ठरतोय वन्यप्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 11:52 PM2018-03-08T23:52:41+5:302018-03-08T23:53:01+5:30
अमरावती नजीकच्या पोहरा-चिरोडी जंगलात दुर्मीळ वन्यप्राणी वास्तव्यास आहेत. त्यांच्यासाठी अमरावती-चांदूर रेल्वे राज्य महामार्ग चितळांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. आतापर्यंत पाच चितळ या मार्गावर अपघातात ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
अमोल कोहळे।
आॅनलाईन लोकमत
पोहरा बंदी : अमरावती नजीकच्या पोहरा-चिरोडी जंगलात दुर्मीळ वन्यप्राणी वास्तव्यास आहेत. त्यांच्यासाठी अमरावती-चांदूर रेल्वे राज्य महामार्ग चितळांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. आतापर्यंत पाच चितळ या मार्गावर अपघातात ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
अमरावती शहराच्या शेवटच्या टोकावरील पाचशे क्वॉर्टर्सपासून राखीव वनक्षेत्र आहे. ते पुढे चांदूररेल्वेपर्यंत विस्तारले आहे. राखीव जंगलात बिबट, हरिण, चित्तळ, नील, रोई, चिक्कार, भेडकी, सांबर, सोनकुत्रे, रानडुक्कर, सायल, ससे, मोर व अन्य दुर्मीळ प्राणी आहेत. चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाºया चिरोडी वर्तुळातील वनखंड क्र. ४१ च्या देवनदी, सावंगा फाटा, विठोबा सावंगा फाटा ते चिरोडी या दोन किलोमीटरच्या अंतरावर आतापर्यंत पाच चितळांना अज्ञात वाहनाच्या धडकेत आपले प्राण गमवावे लागले. यामध्ये तीन मादी व दोन नर अशा एकूण पाच चितळांचा समावेश आहे.
पोहरा-चिरोडी जंगलात चितळ व हरिणांची संख्या अधिक प्रमाणात आहे. त्यांच्याकरिता वनविभागाने जंगलात ठिकठिकाणी पाणवठे तयार केले आहेत. मात्र, उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पाणी पुरेसे ठरत नसल्याने पाण्याच्या शोधात तसेच मुक्त संचार करीत वन्यप्राणी एका क्षेत्रातून दुसºया क्षेत्रात रस्ता ओलांडतात. अमरावती-चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात शिकारीचे प्रमाण कमी असले तरी रात्रीच्या सुमारास वन्यप्राणी पाण्याच्या शोधात फिरताना अशावेळी त्यांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गतिरोधक आवश्यक
वन्यप्राण्यांचे अपघात टाळण्याकरिता चांदूररेल्वे-अमरावती महामार्गावर सूचना देणारे फलक पुरेसे नसून गतिरोधकांची निर्मिती करणे गरजेचे आहे. गतिरोधकांची निर्मिती झाल्यास भरधाव वाहनांवर काहीअंशी अंकुश लागेल, असा वनविभागाचा अंदाज आहे.