ट्रॅव्हल्सचालकांनो, दारू पिलात का?, वाहतूक पोलिसांची तुमच्यावर नजर !
By प्रदीप भाकरे | Published: August 8, 2023 04:44 PM2023-08-08T16:44:08+5:302023-08-08T16:49:32+5:30
वाहतूक पोलिसांची मोहिम : ब्रिथ एनालायझरने तपासणी
अमरावती : बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर १ जुलै रोजी झालेल्या बस अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला होता. अपघाताच्या वेळी बसचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची अतिशय धक्कादायक गोष्ट त्यावेळी उघड झाली होती. अपघातावेळी बसचालकाने मद्यप्राशन करून बस चालवल्याचे फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. त्याअनुषंगाने शहर वाहतूक पोलिसांनी खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकांची ब्रिथ ॲनलायझरने तपासणी सुरू केली आहे.
७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच ते उशिरा रात्रीपर्यंत केलेल्या तपासणीत एकही चालक दारू पिलेला आढळला नाही.
येथील वेलकम टी पाईन्ट परिसरातून पुणे, मुंबई, नाशिक, इंदूर, हैदराबाद अशा लांब पल्याच्या ट्रॅव्हल्स चालतात. तेथे वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त मनिष ठाकरे तथा वाहतूक पोलीस निरीक्षक संजय अढाऊ यांनी अंमलदारासह वेलकम टी पाईंट येथे दोन्ही विभागाचे अधिकारी व अंमलदार सोमवारी संयुक्त अभियान राबवून खासगी ट्रॅव्हल्स बसचे चालक व दुय्यम चालकंची ब्रिथ ॲनालायझर द्वारा मद्यप्राशन संबंधाने अकस्मात तपासणी करण्यात आली.
चालक वाहकांना मार्गदर्शन
ट्रॅव्हल्समध्ये चालक, दुय्यम चालक तसेच वाहक आहेत की नाहीत, याबाबत शहानिशा करुन त्यांना अपघात होण्याचे प्रमुख कारणांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याच प्रमाणे खाजगी ट्रॅव्हल्सच्या संचालक, मालकंना सुध्दा अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आली.