जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फसवणुकीचे अमरावती 'कनेक्शन'
By admin | Published: January 29, 2015 10:59 PM2015-01-29T22:59:18+5:302015-01-29T22:59:18+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे खोटी कागदपत्रे ग्रामपंचायतींना दाखवून अस्तित्वात नसलेल्या योजनेच्या नावावर विमा पॉलिसी काढणाऱ्या प्रकरणातील सूत्रधार अमरावतीचा राजेश पडोळे
अमरावती : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे खोटी कागदपत्रे ग्रामपंचायतींना दाखवून अस्तित्वात नसलेल्या योजनेच्या नावावर विमा पॉलिसी काढणाऱ्या प्रकरणातील सूत्रधार अमरावतीचा राजेश पडोळे असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. शासकीय कर्मचारी भासवून त्याने अनेक ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन हजारो नागरिकांना गंडा घातला आहे. तिवसा ठाण्यात अटकेत असलेल्या दोन आरोपींना ३१ जानेवरीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
शंभर रुपयांत एक लाखाचा विमा असे आमिष दाखवून भांबोरा, अमदाबाद, पालवाडी या गावांतील कित्येक नागरिकांना राजीव गांधी ग्राम विमा योजना व जीवणदायी ग्राम विमा योजनेच्या नावाने फसवणूक करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे अर्ज, विमा पॉलिसीच्या पावतीवर शासनाची राजमुद्रा व पावती फाडणारा ग्रामपंचायत कर्मचारी असल्याने या नागरिकांची फसगत झाली. भांबोरा व पालवाडी येथील व्यक्ती मृत झाल्यावर त्यांना विमा पॉलिसीचा लाभ मिळावा, अशी मागणी नागरिकांनी केल्यावर सरपंच, सचिवांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठल्यावर ही योजनाच अस्तित्वात नाही व ही कागदपत्रे व स्वाक्षरी जिल्हाधिकाऱ्यांची नाही, असे समजल्यानंतर नातेवार्इंकानी तिवसा ठाण्यात तक्रार दाखल केली. तिवसा पोलिसांनी राजेश गवळी (अमरावती) व भांबोरा ग्रामपंचायत कर्मचारी गणेश गवळी यांना अटक केली. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार राजेश गवळी असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
शासनाच्या राजमुद्रेचा वापर करून फसवणुकीचे प्रकार हल्ली वाढले आहेत. मागील महिन्यात शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाची असणाऱ्या सुकन्या योजनेमध्ये 'प्रतिनिधी पाहिजेत' या आशयाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. केवळ एसएमएसद्वारे नाव व पत्ता मागवून त्या उमेदवाराला स्पिड पोस्टद्वारे शासनाचे राजमुद्रा अंकित असलेल्या पत्रावर नियुक्तीपत्र पाठविण्यात आले व सातत्याने संपर्क करून योजनेच्या प्रशिक्षणासाठी ६ हजार रुपये दर्शविलेल्या बँक खात्यात जमा करण्याबद्दल फोन आलेत. अनेक नागरिकांनी शासनाच्या राजमुद्रेवर विश्वास ठेवून रक्कमेचा बँक खात्यात भरणा केला. मात्र, तो नंबर कधीच लागला नाही.