Corona Virus in Amravati; अमरावतीमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह, बाधितांची संख्या पोहचली सहावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 09:01 AM2020-04-18T09:01:37+5:302020-04-18T18:47:09+5:30
शहरातील बफर झोनमध्ये मृत ऑटोचालकाच्या २२ वर्षीय मुलाचा थ्रोट स्वॅब रिपोर्ट शुक्रवारी रात्री २ वाजता पॉझिटीव्ह आला. शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता सहावर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील १६ वर्षीय मुलाचा कोरोना तपासणी अहवाल शनिवारी पहाटे पॉझिटिव्ह आला. अमरावती जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधितांची संख्या आता सहा झाली आहे.
बफर झोन घोषित असलेल्या अमरावती शहरातील नुरानी चौकात १२ एप्रिल रोजी घरात मृत्यू पावलेल्या ५३ वर्षीय ऑटोचालकाचा तो मुलगा होय.
मृताच्या कुटुंबातील चार व्यक्तींना १३ एप्रिल रोजी होम क्वारंटाइन करण्यात आले होते. बाधितांच्या संपर्कातील १५ व्यक्तींची शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी करून त्यांना सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात क्वारंटाइन केले आहे.
हैदरपुरा व हाथीपुरा भागात कोरोनाचे पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी हा परिसर बफर झोन व याअंतर्गत आठ कन्टोन्मेंट घोषित केले आहे. या परिसरात जाणारे सर्व रस्ते सील करण्यात आलेत. जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली. या बफर झोनमध्ये आरोग्य विभागाच्या १०० पेक्षा अधिक पथकांद्वारे गृहभेटी सुरू आहेत.
दरम्यान, याच परिसरातील बाबा चौक व नुरानी चौकादरम्यान राहणाºया ५३ वर्षीय ऑटोचालकाचा १२ एप्रिलला राहत्या घरी मृत्यू झाला. त्यापूर्वी त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मृत्यू हृदयाच्या आजाराने झाल्याचे डॉक्टरांचे निदान होते, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे यांनी दिली. त्यांचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला नव्हता. मृताच्या अंत्यसंस्काराला पाच व्यक्तींना परवानगी देण्यात आली होती. त्याच दिवशी या कुटुंबातील पाच व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले. त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले. मात्र बाधित युवक विलगीकरण काळात अनेकदा बाहेर जाऊन आल्याने त्याच्या संपर्कात किती व्यक्ती आल्या, हे शोधण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. किमान २५ ते ३० व्यक्ती या युवकाच्या संपर्कात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी दिली.
नुरानी चौकातील १८ वर्षीय युवकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आलेला आहे. त्याच्या संपर्कात २५ ते ३० व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्वांचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले. त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
- शैलेश नवाल,
जिल्हाधिकारी, अमरावती