टिंग्या हत्याप्रकरणात अमरावतीचा नगरसेवक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:26 PM2019-01-14T23:26:47+5:302019-01-14T23:27:14+5:30

शहरात शुक्रवारी जुन्या आपसी वादातून झालेल्या हत्याप्रकरणात अमरावती महानगरपालिकेतील काँग्रेसचा नगरसेवक तथा माजी उपमहापौर अडकण्याची शक्यता दिसत आहे. आरोपींची संख्या वाढण्याची चिन्हेदेखील आहेत.

Amravati corporator in Tingya murder case! | टिंग्या हत्याप्रकरणात अमरावतीचा नगरसेवक !

टिंग्या हत्याप्रकरणात अमरावतीचा नगरसेवक !

Next
ठळक मुद्देआरोपींची संख्या वाढणार ? : घटनेपूर्वीचे छायाचित्र व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : शहरात शुक्रवारी जुन्या आपसी वादातून झालेल्या हत्याप्रकरणात अमरावती महानगरपालिकेतील काँग्रेसचा नगरसेवक तथा माजी उपमहापौर अडकण्याची शक्यता दिसत आहे. आरोपींची संख्या वाढण्याची चिन्हेदेखील आहेत.
पोलीस सूत्रांनुसार, चांदूर रेल्वेजवळील चमकुरा ढाब्यावर आपसी वादातून अनिस मोहम्मद ऊर्फ टिंग्या नूर मोहम्मद (२९) याचा खून करण्यात आला. या हत्याप्रकरणात चांदूर रेल्वे पोलिसांची कसून चौकशी सुरू झाली आहे. न्यायालयात साक्ष असल्यामुळे मुख्य आरोपी नईम खान हा घटनेच्या दिवशी चांदूर रेल्वे शहरात आला होता. याच दिवशी मृत टिंग्या व नईम यांनी पोहरा येथील एका धार्मिक स्थळी अमरावतीच्या कथित नगरसेवकाची भेट घेतली होती. त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर झळकले आहे.
दरम्यान, टिंग्या व नईम यांच्यात जुना वाद असल्यामुळे ते पूर्वी सोबत कधीही आले नाहीत. परंतु, घटनेच्या दिवशी त्यांनी जेवणसुद्धा केले. त्यामुळे त्यांची भेट करून देणारा हा नगरसेवकच असण्याची शक्यता आहे. त्यामुळे चांदूर रेल्वे पोलिसांनी नोटीस बजावून पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश त्या नगरसेवकाला दिले आहेत.
तात्काळ हजर न झाल्यास अटकेची कारवाई होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाचे तार आता अमरावतीशी जुळल्याचे दिसत आहे तसेच सदर हत्याकांडाला गांजा तस्करीची किनार असल्याचे पुढे येत आहे. या प्रकरणात आता आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे ठाणेदार ब्रम्हदेव शेळके यांनी सांगितले.
पोलिसांनी अटक केलेले नईम खान रहमान खान (३०, रा. राजीव गांधीनगर), सतीश अनंत कावरे (३३, रा. डांगरीपुरा), राहुल मधुकर सहारे (२८, रा. अंजनसिंगी), चेतन बाबाराव चित्रीव (१९, रा. जुना उमरसरा, यवतमाळ ह.मु. मेहरबाबानगर), शेख जाकीर ऊर्फ गोलू वल्द शेख नासीर (२९, रा. डांगरीपुरा) व राहुल बच्चनलाल कनासिया (२०, रा. महादेवघाट, चांदूर रेल्वे) या सहा आरोपींना न्यायालयाने सोमवारी १५ जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली. त्यांच्याकडून दोन दुचाकी व चायना चाकू जप्त केला. आरोपींनी गुन्हा कबूल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सोमवारी पुन्हा दंगा नियंत्रक पथक शहरात
शहरात या प्रकरणानंतर शांतता कायम आहे. परंतु, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून सोमवारीसुद्धा अमरावती येथील दंगा नियंत्रक पथकाची चमू शहरात होती. आरोपींची संख्या वाढल्यास शहरात चांगलाच बंदोबस्त ठेवावा लागणार आहे.

Web Title: Amravati corporator in Tingya murder case!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.