राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत अमरावतीची जोडी अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 04:00 PM2017-11-08T16:00:16+5:302017-11-08T16:00:32+5:30
औरंगाबाद येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदद्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातून अमरावतीचे ओम दांडगे व रोहित भटकर या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
अमरावती - औरंगाबाद येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदद्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातून अमरावतीचे ओम दांडगे व रोहित भटकर या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
शहरातील मणिबाई गुजराती हायस्कूलचे विद्यार्थी ओम दांडगे व रोहित भटकर यांची राज्यस्तरीय स्पर्धेत खेळण्यासाठी अमरावती विभागीय संघात निवड झाली होती. औरंगाबाद येथे ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत या दोघांनी अॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्सच्या मेन्स पेअर या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्यांनी पुणे येथील बी अँड जी (आर्मी) स्कूलच्या चमूला अंतिम फेरीत हरविले. या विजयामुळे त्यांची कोलकाता येथे होत असलेल्या राष्ट्रीय जिम्नॅस्टिक रिद्मिक व अॅक्रोबॅटिक्स क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी पुण्यात ७ नोव्हेंबरपासून आयोजित प्रशिक्षणासाठी ते रवाना झाले आहेत.
औरंगाबाद येथे झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात जिल्हा क्रीडा अधिकारी उर्मिला मोराळे, क्रीडा व युवक सेवा औरंगाबाद विभागाचे उपसंचालक राजकुमार महादावाड, क्रीडा व युवक सेवा सहसंचालक नरेंद्र सोपल उपस्थित होते. त्यांच्या विजयाबद्दल प्रशिक्षक संजय हिरोडे, आशिष हातेकर, प्रणव वैद्य, सचिन कोठारे, अक्षय अवघाते यांनी कौतुक केले.