अमरावतीच्या डेपो मॅनेजरने लावला गळफास; कारण अज्ञात
By प्रदीप भाकरे | Published: May 2, 2023 06:15 PM2023-05-02T18:15:49+5:302023-05-02T18:16:13+5:30
Amravati News एसटी महामंडळाच्या अमरावती आगार व्यवस्थापकांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २ मे रोजी सकाळी उघड झाली.
अमरावती: एसटी महामंडळाच्या अमरावती आगार व्यवस्थापकांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २ मे रोजी सकाळी उघड झाली. स्थानिक शिवाजीनगर परिसरातील शासकिय निवासस्थानी त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेने एसटी महामंडळ कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सुहास पांडूरंगजी पांडे (४६, रा. शिवाजीनगर, अमरावती) असे आत्महत्या करणाऱ्या आगर व्यवस्थापकाचे नाव आहे.
सुहास पांडे काही महिन्यांपासून अमरावती आगारात आगार व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. ते कुटूंबियांसह शिवाजीनगर येथे शासकिय निवासस्थानी वास्तव्याला होते. मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास घरातील एका खोलीत त्यांनी गळफास लावल्याचे समोर आले. याचवेळी कुटूंबातील अन्य सदस्य घरातील दुसऱ्या खोलीत झोपले होते. तत्काळ ही माहिती गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. त्यांना तातडीने इर्विन रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांनी आत्महत्या का केली, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सुहास पांडे यांच्या पार्थिवाचे विच्छेदन करण्यात आले असून मंगळवारी सांयकाळी त्यांच्या पार्थिवावर यवतमाळ जिल्हयातील नेरपरसोपंत येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.