अमरावती जिल्ह्यात १,५४६ गावांनी वेशीवरच रोखला कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 11:45 AM2020-08-14T11:45:00+5:302020-08-14T11:46:30+5:30
अमरावती : जिल्ह्यात १,५४६ गावांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रभावी अंमल करून कोरोनाचा संसर्ग गाव वेशीवर रोखला असल्याची सुखद वार्ता आहे.
जितेंद्र दखने।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात १३१ दिवसांत ३ हजार ४६७ कोरोना संक्रमितांची नोंद झाली. महापालिका क्षेत्रासह जिल्ह्याच्या १४१ गावांमध्ये कोरोनाग्रस्त निष्पन्न झाले आहेत. मात्र, १,५४६ गावांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रभावी अंमल करून कोरोनाचा संसर्ग गाव वेशीवर रोखला असल्याची सुखद वार्ता आहे.
अमरावती महापालिका क्षेत्रात हाथीपुरा भागात ४ एप्रिलला जिल्ह्यातील पहिल्या कोरोना संक्रमित रुग्णाची नोंद झाली होती. त्यानंतर ग्रामीण भागात शिराळा येथे २ मे रोजी संक्रमित रुग्णाची नोंद करण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, ग्रामीण भागात बुधवारपर्यंत १४१ गावांत ७७३ कोरोना संक्रमितांची नोंद झाली. त्यापैकी ३०६ जणांवर कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. ४३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ग्रामीण भागात २९ संक्रमितांचे मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अमोल येडगे यांच्या नेतृत्वात ‘अमरावतीकर, मात करूया कोरोनावर’ या मोहिमेंतर्गत , १४ पंचायत समिती, १० नगर परिषद, चार नगरपंचायतींमध्ये गाव व वॉर्डनिहाय वैद्यकीय अधिकारी, आशा, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून चार वेळा सर्वेक्षण करण्यात आले. गावात बाहेरून आलेल्या व्यक्ती तसेच सर्दी, ताप, खोकला, श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्तीचा नोंदी घेण्यात आल्यात. बाहेरून आलेल्या व्यक्तींना सक्तीने स्थानिक शाळा, वसतिगृह इमारतींमध्ये १४ दिवस क्वारंटाईन करून आजारी व्यक्तीशी वारंवार संपर्क साधण्यात आला. आवश्यक तेव्हा तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांशी संपर्क साधून संबंधित व्यक्तींची तपासणी तसेच त्यापैकी आजारी व्यक्तींना आवश्कयतेनुसार स्वॅब टेस्टकरिता रेफर करणे यांसारख्या उपाययोजना गावोगावी करण्यात आल्याने जिल्ह्यातील १३ आॅगस्टपर्यत दीड हजार गावे कोरोनामुक्त आहेत. गावकऱ्यांची सकारात्मक वृत्ती, त्याला प्रशासनाची समर्थ अशी साथ मिळाल्याने जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यास मदत झाली.
नेमके काय केले?
१४ तालुक्यांतील प्रत्येक गावात १६ मार्चपासून कोरोना सनियंत्रण व दक्षता समितीची स्थापना करण्यात आली.
ग्रामस्तरीय कोरोना संनियंत्रण समितीद्वारे गावोगावी ’डोअर टू डोअर’ सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली.
निर्जंतुकीरण करण्यासाठी धुरळणी व सोडियम हायपोक्लोराईडची नियमित फवारणी करण्यात आली
कोविड १९ चा संसर्ग गावात होऊ नये, याकरीता बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश करु नये यासाठी नाकाबंदी.
प्रत्येक व्यक्तीने नियमित हात धुणे, सॅनिटायझर, साबण तसेच चेहºयाला मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले.
संसर्गापासून बचावासाठी जाहीर मुनादी, प्रसिध्दी पत्रक व ध्वनिक्षेपकाद्वारे प्रबोधन केले.