अमरावती जिल्ह्यात लम्पीचा विळखा, ३४५ जनावरे बाधित तर १३ मृत्यूमुखी
By जितेंद्र दखने | Published: September 19, 2022 07:15 PM2022-09-19T19:15:17+5:302022-09-19T19:16:08+5:30
अमरावती जिल्ह्यात 345 जनावरे लम्पी आजाराने बाधित झाली आहेत तर 13 मृत पावले आहेत.
अमरावती : जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा विळखा वाढतच चालला आहे. सोमवारपर्यंत लम्पी आजाराने १,३४५ जनावरे बाधित झाली आहेत, तर १३ जनावरांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे ४१६ जनावरे बरी झाली असून ९१६ जनावरांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. मृत जनावरांमध्ये प्रत्येकी एक गायी व वासरू आणि उर्वरितांमध्ये बैलाचा समावेश आहे.
जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ९४ गावांमध्ये आतापर्यत लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव पसरला आहे. यात सर्वाधिक लागण ही बैलवर्गीय जनावरांना झाली आहे. त्यानंतर गायी व काही वासराचा समावेश आहे. बाधित जनावरांवर पशुसंवर्धन विभागाकडून तातडीने उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. पुरुषोत्तम सोळंके यांनी दिली. याशिवाय जिल्ह्याला आतापर्यत सुमारे २ लाख ५० हजार एवढ्या लस साठ्याचा पुरवठा करण्यात आला आल्याची माहिती सहायक उपायुक्त डॉ. राजीव खेरडे यांनी दिली.
याशिवाय आतापर्यंत एक लाख एवढ्या पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने येत असलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी जिल्ह्यात १६८ खासगी पशुवैद्यकांनी मदत घेतली आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणासह अन्य उपाययोजना सुरू असल्या तरी दररोज बाधित जनावरांचा वाढता आकडा प्रशासनाची चिंता वाढविणारा आहे.
काय म्हणते आकडेवारी?
बाधित गावे- ९४
लागण झालेले पशुधन-१३४५
बरे झालेले -४१६
मृत्यू -१३
विलगीकरणात -९१६
लम्पी हा संसर्गजन्य आजार
लम्पी रोग हा केवळ गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटनाशकापासून पसरतो.हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. लम्पी स्किन हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
जिल्ह्यातील १४ तालुक्यामधील ९४ गावात लम्पी स्किन डिसीजचे लागण झाली आहे. यामध्ये १३४५ जनावरे बाधित झाली. यापैकी ४०० हून अधिक जनावरे बरी झाली. बाधित जनावरांवर पशुसंवर्धन विभागाकडून उपचार व लसीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. वाढता प्रकोप थांबविण्यासाठी आमचे प्रयन्न सुरू आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. संजय कावरे यांनी दिली.