अखेर ‘त्या’ मूकबधिर महिलेचा पत्ता शोधण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 10:27 PM2020-06-02T22:27:36+5:302020-06-02T22:28:02+5:30
‘लोकमत’ने या महिलेची अडचण लोकदरबारात मांडल्यानंतर हे सारे घडून आले.
गणेश देशमुख
अमरावती : कोराना संशयित म्हणून कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या, मूकबधिर असलेल्या, हिंदी-मराठी न कळणाºया, येथील जिल्हा रुग्णालयात अडकून पडलेल्या महिलेचा पत्ता शोधण्यात अखेर अमरावती जिल्हा प्रशासनाला यश आलेच. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी साडी-चोळी देऊन विशेष वाहनाने त्या महिलेला मंगळवारी रवाना केले. अवघे रुग्णालय निरोप द्यायला उपस्थित होते. ‘लोकमत’ने या महिलेची अडचण लोकदरबारात मांडल्यानंतर हे सारे घडून आले.
आधार प्रणालीतून शोधला पत्ता
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी महिलेची रुग्णालयात भेट घेतली. पत्ता कळत नसल्याने ठणठणीत झाल्यावरही तिचा सांभाळ करण्याचे आदेश जिल्हा रुग्णालयाला दिले तसेच महिलेच्या फिंगरप्रिंट्सवरून आधार प्रणालीद्वारे महिलेचा मूळ पत्ता शोधण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानुसार रुग्णालयात तत्पुरते आधार केंद्र उभारले गेले. महिलेचे आधार कार्ड डिटेल काढण्याची पूर्ण प्रक्रिया पार पाडली गेली. पूर्वी कार्ड काढलेले असल्यामुळे ते आधार कार्ड मिळाले. त्यावर पत्ता होता. ६ मे रोजी दाखल झालेल्या त्या महिलेचा पत्ता शोधण्यासाठी महिनाभर अनेकांनी प्रयत्न केले. या प्रवासात दिव्यांग साहाय्यता केंद्राचे पंकज मुद्गल आणि नीरज तिवारी या दुभाषींंची उल्लेखनीय मदत झाली.
ती आंध्र प्रदेशातील कुर्नूलची
त्या महिलेचे नाव के. मंजुळा असे आहे. त्या आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील मंदिगिरी (अडोणी) येथील रहिवासी आहेत. पालकमंत्री, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉक्टर, काळजी घेणा-या नर्स, प्रयत्न करणारे इतर लोक निरोप द्यायला उपस्थित होते. अमरावतीकरांच्या अशा प्रेमाने मंजुळाताई भारावल्या होत्या.
कुर्नूल जिल्हा प्रशासनाशी संपर्क
पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार, अमरावती जिल्हा प्रशासनाने कुर्नूल जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. प्रवासाच्या आवश्यक परवानग्या तत्काळ मिळविण्यात आल्यात. विशेष वाहनाने महिलेला रवाना करण्यात आले. तहसील कार्यालयाचे प्रशांत पांडे हे अमरावती प्रशासनाचे प्रतिनिधी या नात्याने महिलेसोबत आहेत.