अमरावती जिल्हा सलग आठव्यांदा चॅम्पियन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:14 AM2021-01-20T04:14:19+5:302021-01-20T04:14:19+5:30
कॅप्शन - बुलडाणा येथील स्पर्धेत सहभागी अमरावतीचे खेळाडू. अमरावती : विदर्भ पाॅवरलिफ्टिंग असोसिएशन व बुलडाणा जिल्हा पाॅवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या ...
कॅप्शन - बुलडाणा येथील स्पर्धेत सहभागी अमरावतीचे खेळाडू.
अमरावती : विदर्भ पाॅवरलिफ्टिंग असोसिएशन व बुलडाणा जिल्हा पाॅवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वरिष्ठ महिला व पुरुष पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेत अमरावती जिल्हा सलग आठव्यांदा चॅम्पियन ठरला. चार सुवर्ण, तीन रौप्य व तीन कास्य पदकांसह जिल्ह्याला सांघिक विजेतेपदाचा बहुमान मिळवला.
बुलडाण्याच्या महेश भवन येथे १७ जानेवारी रोजी माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडले. स्पर्धेत प्रणित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील एकूण १३ खेळाडूंनी सहभाग घेतला. ६३ किलो वजनगटात नेहा मुकेश कलोसिया हिने २३० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले. ५७ किलो वजनगटात १९० किलो वजन उचलून अंजुला नागले व ७२ किलो वजनगटात प्रतीक्षा कडून हिने २५० किलो वजन उचलून रौप्यपदक पटकविले. पूनम जाधव हिने कडवी झुंज दिली.
मुलांमधून १२० किलो वजनगटात प्रयास दुबे याने ५४० किलो, ८३ किलो वजनगटात स्वप्निल लिखितकर याने ६१० किलो, तर ६६ किलो वजनगटात प्रणित देशमुख याने ४२२ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकविले. ८३ किलो वजनगटात सुदेशसिंह राठोड याने ५२५ किलो वजन उचलून रौप्यपदक पटकविले. १०५ किलो वजनगटात मयूर क्षार याने ३९५ किलो व ५९ किलो वजनगटात अथर्व श्रीरामवार याने ३१० किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले. विजयी खेळाडूंचे आगामी महिन्यात कोइम्बतूर (तामिळनाडू) येथे होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.