अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाला ढोंगी ‘बाबा’चा विळखा; दारू अन् गांजाचा नैवेद्य

By उज्वल भालेकर | Published: June 8, 2024 09:13 PM2024-06-08T21:13:33+5:302024-06-08T21:14:14+5:30

इर्विन रुग्णालय परिसरात ढोंगी बाबा, आवारात पुन्हा-पुन्हा अंधश्रद्धेला खत-पाणी, अनेक कार्यक्रम बाबांच्या नावे होतात. मन प्रसन्न करणारी ही वास्तू आहे. तरीदेखील रुग्णालयाच्या आवारात बाबांना अवतरीत करण्याचा उपद्व्याप ठराविक कालावधीनंतर केला जातो.

Amravati District General Hospital accused of impostor hypocrite'; An offering of alcohol and ganja | अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाला ढोंगी ‘बाबा’चा विळखा; दारू अन् गांजाचा नैवेद्य

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाला ढोंगी ‘बाबा’चा विळखा; दारू अन् गांजाचा नैवेद्य

 

अमरावती - जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात भिंतीला गुणवंतबाबांची छबी डकवून एका तथाकथित ‘बाबा’ने पूजापाठाचे अवडंबर माजविले आहे. रुग्णालयाला ऑक्सिजन पुरविणाऱ्या पाइपच्या पुढ्यात दारू अन् गांजाचा नैवेद्य ठेवला जातो. सामुदायिक आरोग्य जपण्यासाठी झटणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पुन्हा-पुन्हा अंधश्रद्धेला खत-पाणी घातले जात आहे. अनेकदा ते प्रशासनाच्या अंगलट आले आहे. तरीदेखील अशा प्रकाराला परवानगी कशी मिळते, हा नागरिकांचा प्रश्न अनुत्तरित आहे.

रुग्णालय परिसरात शनिवारी दुपारी १ च्या सुमारास हा बाबा त्याची विशेष वेशभूषा साकारून बसला होता. त्याच्या पुढ्यात प्रसाद म्हणून दारू, तसेच गांजाचा नैवेद्य ठेवण्यात आला होता. त्याच्यापुढून ये-जा करणारे कथित भक्त गुणवंतबाबांच्या छबीला हात जोडल्यानंतर या बाबाच्या पायाही पडत होते. यामध्ये गर्दुल्यांचा भरणा मोठ्या प्रमाणात होता, हे विशेष.

दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयात काही वर्षांपूर्वी गुणवंतबाबांनी अखेरचा श्वास घेतला. तेव्हापासून त्यांना मानणाऱ्या भक्तमंडळींकडून रुग्णालयाच्या आवारातच बाबांच्या नावे मंदिर उभारण्याची परवानगी मिळावी, यासाठी प्रयत्न होत होते. तथापि, रुग्णसेवेला प्राधान्य देत प्रशासनाने ती मागणी फेटाळली. त्यानंतर रुग्णालयाच्या मागे खापर्डे बगीचा परिसरात बाबांचे छोटेसे मंदिर उभारण्यात आले. तेथे भाविकांची रीघ असते.

अनेक कार्यक्रम बाबांच्या नावे होतात. मन प्रसन्न करणारी ही वास्तू आहे. तरीदेखील रुग्णालयाच्या आवारात बाबांना अवतरीत करण्याचा उपद्व्याप ठराविक कालावधीनंतर केला जातो. हा तथाकथित बाबा व त्याच्या पायाला लागलेली भक्तमंडळी त्याचाच परिपाक आहे.
एकीकडे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, तसेच धूम्रपान कायद्याने गुन्हा आहे; परंतु जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातच हा सर्व प्रकार दिवसाढवळ्या होत असल्याने रुग्णालय प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे.

रुग्णालय परिसरात चालणाऱ्या या सर्व प्रकारावर पोलिसांकडून कारवाई अपेक्षित आहे. जर रुग्णालय परिसरात कोणी दारू, तसेच गांजा आणत असेल तसेच बुवाबाजीच्या नावावर अंधश्रद्धा पसरवत असेल, तर पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांकडून लक्ष देणे गरजेचे आहे.
डॉ. नरेंद्र सोळंके, आरएमओ, इर्विन रुग्णालय

Web Title: Amravati District General Hospital accused of impostor hypocrite'; An offering of alcohol and ganja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.