अमरावती जिल्ह्याची नजर अंदाज ५३ पैसैवारी; जिल्हा प्रशासनाकडून अहवाल जाहीर
By जितेंद्र दखने | Published: September 30, 2022 06:03 PM2022-09-30T18:03:41+5:302022-09-30T19:30:37+5:30
शेतातील पीक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी महसूल विभागाची यंत्रणा पैसेवारी जाहीर करते.
सततच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना जिल्हा प्रशासनाने नजर अंदाज ५३ पैसेवारी शुक्रवारी जाहीर केली. यामध्ये केवळ सहा तालुक्यांना न्याय देण्यात आला तर उर्वरित तालुक्यात पीक आलवेल असल्याचे चित्र दिसून येते. याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. शेतातील पीक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी महसूल विभागाची यंत्रणा पैसेवारी जाहीर करते. यावरून पीक परिस्थितीचा अंदाज येतो. यासोबत रॅण्डमली पिक कापणी प्रयोग होतात. त्यावरून उत्पन्नाचा अंदाज येतो. या अंदाजानुसार केंद्र शासन शेतमालाचे आयात निर्यातीचे धोरण ठरविते. यामुळे या अहवालाला सर्वाधिक महत्त्व आहे. प्रत्यक्ष जिल्ह्याची स्थिती नाजूक असताना नजर अंदाजाच्या पैसेवारीचा प्रथम अहवाल ५३ पैसेवारीचा आला आहे. अंतिम अहवाल आल्यानंतरच जिल्ह्यातील पिक परिस्थिती कशी याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
नजर अंदाज पैसेवारी जाहीर करण्यासाठी जुलै ते सप्टेंबर अखेर पर्यतचे निरीक्षण ग्राह्य धरले जाते. महसूल विभागाची यंत्रणा याचे सर्वेक्षण करते. ही यंत्राचा सप्टेंबरला अहवाल सादर करुन तो जिल्हाधिकारी यांचेकडून मंजूर करण्यात आला आहे. या अहवालानुसार जिल्ह्यातील १९९५ गावांपैकी लागवडी योग्य असलेल्या गावांची संख्या१९५९ आहे. यात १४ तालुक्यातील ५० टक्यापेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावामध्ये ८५१ गावांचा समावेश आहे.तर ११०८ गावांची नजर अंदाज आणेवारी ही ५० टक्यापेक्षा जास्त आली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ११५९ गावांची आणेवारी जाहीर केली आहेत.
यात सन २०२२-२३ ची नजर अंदाज आणेवारी ही ५३ पैसेवारी आली आहे. जिल्ह्यातील ९० महसुली मंडळाकडून महसूल विभागाचे यंत्रणेचा पहिला नजर पैसेवारीचा अहवाल आला आहे.या अहवालात काही तालुक्यातील काही गावांची स्थिती चिंताजनक आहे. मात्र काही तालुक्यातील गावांची पिक पैसेवारी ५० टक्याच्या आत तर काही तालुक्याची पैसेवारी ही ५३ पैसेवारीपर्यत आली आहे. अतिवृष्टीने संपूर्ण जिल्ह्यातील पिकांना मोठा फटका बसला. पिकाची वाढ खुंटली, शेत शिवारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतात तण वाढले अशी परिस्थिती असताना नजर पैसेवारी ५० टक्क्यापेक्षा जास्त आली आल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे.
तालुकानिहाय ५० टक्याच्या आतील व वरील पैसेवारी
सन २०२२-२३ च्या खरीप पिकांची नजर अंदाज पैसेवारी मध्ये ५० टक्याच्या आता मध्ये असलेल्या तालुके व पैसेवारी यामध्ये चांदूर रेल्वे ४७,धामनगांव रेल्वे ४६,मोर्शी ४१,वरूड ४३,अचलपूर ४८,चांदूर बाजार ४६ या सहा तालुक्याची पैसेवारी ही ५० पैसेवारीच्या आत आहे.तर ५० पेक्षा जास्त आणेवारी असलेल्या तालुक्यामध्ये अमरावती ५४,भातकुली ६४,तिवसा ५५,नांदगाव खंडेश्वर ५४,दर्यापूर ६४,अंजनगाव सुजी ५७,धारणी ६२,चिखलदरा ५४ अशा आठ तालुक्याची आणेवारी ही ५३ पैसेवारी हून अधिक आहे.