पीएफआयचा अमरावती जिल्हाध्यक्ष ताब्यात; शहर पोलिसांची कारवाई

By प्रदीप भाकरे | Published: September 27, 2022 05:52 PM2022-09-27T17:52:16+5:302022-09-27T18:28:42+5:30

पीएफआयवर राज्यभरात पुन्हा छापे

Amravati district president of PFI arrested; Possibility of handover to NIA | पीएफआयचा अमरावती जिल्हाध्यक्ष ताब्यात; शहर पोलिसांची कारवाई

पीएफआयचा अमरावती जिल्हाध्यक्ष ताब्यात; शहर पोलिसांची कारवाई

googlenewsNext

अमरावती : दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) चार दिवसांपूर्वी मुंबई-महाराष्ट्रासह केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आदी ११ राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अनेक ठिकाणांवर छापे टाकले. ‘एनआयए’ने या राज्यांमधील 'पीएफआय'च्या राज्य आणि जिल्हा स्तरावरील नेत्यांच्या कार्यालयांसह घरोघरी झडती घेतली. या कारवाईत तपास यंत्रणांनी शंभरपेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकून तब्बल १०६ जणांच्या मुसक्या आवळल्या. त्याच मालिकेत शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पीएफआयच्या जिल्हाध्यक्षाला मंगळवारी पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले.  

सोहेल अन्वर अब्दुल कदीर उर्फ सोहेल नदवी (३८, रा. छायानगर, अमरावती) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. त्याला नागपुरी गेट पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले असून, मंगळवारी संपुर्ण दिवसभर त्याची चौकशी करण्यात आली. त्याला एनआयएकडे सुपुर्द केले जाईल की कसे, हे तूर्तास अनुत्तरित आहे. तत्पूर्वी, शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांनी सोहेलला ताब्यात घेण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

सदर कारवाईबाबतचा अधिक तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. त्याला पोलीस आयुक्तांसमक्ष हजर करण्यात येणार असल्याची माहिती नागपुरी गेटचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी दिली. त्याला सीआरपीसीच्या कलम १५१ अन्वये ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

येथील बहुचर्चित उमेश कोल्हे यांच्या हत्याप्रकरणीदेखील एनआयएने सोहेल अन्वर उर्फ सोहेल नदवीची नागपुरी गेट पोलीस ठाण्यात बोलावून मॅरेथॉन चौकशी केली होती. २१ जून रोजी उमेश कोल्हे यांचा गळा कापून खून करणाऱ्या आरोपींपैकी काहीजण पीएफआयशी संबंधित आहेत का, त्यांना पीएफआयने फंडिंग केली की कसे, यासाठी त्याची कसून चौकशी करण्यात आली होती. नूपुर शर्मा हिच्या समर्थनाची पोस्ट शेअर केल्याने उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. तो तपास सध्या एनआयए करीत आहे. त्यामुळे सोहेलला अटक केली जाते की, चौकशीअंती सोडले जाते, हे तुर्तास अनुत्तरित आहे.

काय आहे संबंध? 

देशामध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या घातपाती, तसेच समाजकंटकांकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या, पोलीस कारवाईमध्ये पकडलेल्या अनेकांचा संबंध कोणत्या ना कोणत्या प्रकारे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी येत असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अहवालातून समोर आले. या संघटनेच्या वतीने परदेशातून विशेषतः आखाती देशातून येणारा पैसा देशविघातक कृत्यांसाठी वापरला जात असल्याची माहिती होती. ही संघटना देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे पुरावे समोर आल्यानंतर एनआयए आणि ईडीने देशभरातील १५ राज्यांतील शंभरहून अनेक ठिकाणी छापे टाकले. अमरावतीची कारवाईदेखील त्याचाच एक भाग असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Amravati district president of PFI arrested; Possibility of handover to NIA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.