पोषण पंधरवड्यात अमरावती जिल्हा महाराष्ट्रात दुसरा

By जितेंद्र दखने | Published: April 12, 2023 08:24 PM2023-04-12T20:24:08+5:302023-04-12T20:24:15+5:30

१५ मार्च ते ३ एप्रिल : जिल्ह्यात विविध उपक्रमांनी जनजागृती

Amravati district second in Maharashtra in nutrition fortnight | पोषण पंधरवड्यात अमरावती जिल्हा महाराष्ट्रात दुसरा

पोषण पंधरवड्यात अमरावती जिल्हा महाराष्ट्रात दुसरा

googlenewsNext

अमरावती : बालकांना योग्य पोषण आहार मिळावा आणि त्यांची योग्य काळजी घेतली जावी, पालकांमध्ये जाणीव जागृती व्हावी यासाठी १५ मार्च ते ३ एप्रिल या काळात सर्वत्र पोषण पंधरवडा साजरा करण्यात येतो. यानिमित्त अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून बालकांचे वजन घेणे, आहाराचे महत्त्व समजून सांगणे, गरोदर मातांची काळजी घेणे, स्तनपानाचे महत्त्व समजावून सांगणे यासारखे अनेक उपक्रम राबविण्यात येते. पोषण पंधरवाडयात राज्यात जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत पुन्हा एकदा  द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.

दरवर्षी मार्च महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात  पोषण पंधरवडा साजरा करण्यात येतो. बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांना योग्य आहार आणि त्यांचे योग्य पोषण होईल यादृष्टीने विविध बाबी संगण्यात येतात. पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. कमी वजनाच्या बालकांसाठी उपाययोजना करण्यात येतात. बालकांना आनंददायी असे पूर्वप्राथमिक आरोग्य शिक्षण दिले जाते. त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे, अंगणवाडी केंद्रातील विविध योजनांची लाभार्थ्याना माहिती देणे असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनात यंदाही पोषण पंधरवाडयाचे अनुषंगाने महिला व बालकल्याण विभागाने  सूक्ष्म नियोजन करून जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांतून विविध कार्यक्रम राबविले होते.

या उपक्रमातील कार्यक्रमाची केंद्र शासनाच्या वेबसाइटवर नोंदणीसुद्धा केली होती. यावर्षी पुणे जिल्हा हा राज्यात प्रथम, अमरावती द्वितीय, तर अहमदनगर जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. महिला बालविकास विभागाने  पोषण पंधरवाडयात उत्तम कामगिरी केली आहे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके यांच्या नेतृत्वात सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी राबविलेल्या उपक्रमामुळे जिल्ह्याला हा बहुमान मिळवून दिला आहे.

विभागाने पोषण पंधरवड्यानिमित्त अंगणवाडी केंद्रात नियोजनबद्धरीत्या विविध कार्यक्रम राबवून जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी उत्तम कामगिरी केल्यामुळे जिल्ह्याला राज्यातून द्वितीय क्रमांकाचा बहुमान मिळाला याबद्दल सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका आणि बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.डॉ. कैलास घोडके,उपमुख्य कार्यकारी अधिकारी

Web Title: Amravati district second in Maharashtra in nutrition fortnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.