अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत २३२ महिला झाल्या रुग्णवाहिकेतच प्रसूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 11:29 AM2017-11-25T11:29:16+5:302017-11-25T11:29:36+5:30
‘डायल १०८’ ही सुविधा सुरू झाल्यापासून राज्यात १५ हजार तर जिल्ह्यात २३२ गर्भवती महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेत झाली, तर हजारो गर्भवतींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करता आले. ही रुग्णवाहिका गर्भवती महिलांसाठी ‘संकटमोचन’ ठरली आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : ‘डायल १०८’ ही सुविधा सुरू झाल्यापासून राज्यात १५ हजार तर जिल्ह्यात २३२ गर्भवती महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेत झाली, तर हजारो गर्भवतींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करता आले. ही रुग्णवाहिका गर्भवती महिलांसाठी ‘संकटमोचन’ ठरली आहे.
आरोग्य विभागाने अतितातडीच्या रुग्णांमध्ये गर्भवती महिलांचा समावेश केला आहे. गर्भवतीस प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यास रुग्णवाहिका उपचारासाठी दाखल करते. अशावेळी प्रथम शासकीय रुग्णालयास प्राधान्य दिले जाते. रुग्णालयाच्या वाटेवर अनेक महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेतच होते. यामध्ये डॉक्टर उपलब्ध असल्याने आणि संबंधितांना प्रसूतीचे प्रशिक्षण दिल्याने महिलेची प्रसूती सुखरूप होते.
रुग्णवाहिकेत प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टर असतात. प्रसूतीसाठी आवश्यक असणारी साधनेही उपलब्ध असतात. प्रत्येक प्रसूतीच्या वेळी नवीन उपकरणांचा वापरही केला जातो. त्याचबरोबर रुग्णवाहिका जंतुनाशक औषधाची फवारणी करून साफ केली जाते. तत्पर व सुसज्ज सेवा यामुळे राज्यात १५ हजार १३९ प्रसूती या रुग्णवाहिकेत झाली आहे. अमरावती जिल्ह्यात २०१४ ते आॅगस्ट २०१६ पर्यंत २३२ एवढ्या महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेत झाल्याचा आरोग्य विभागाकडे आकडा आहे.