अमरावती जिल्ह्यात शिक्षकांचे मोबाईलवर इलू-इलू, विद्यार्थ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:45 PM2017-11-18T13:45:10+5:302017-11-18T13:48:13+5:30
अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विहीगावच्या जिल्हा परिषद पूर्वमाध्यमिक शाळेतील दोन शिक्षक कायमच मोबाईलवर व्यस्त राहत असल्याची तक्रार पालकांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
सुदेश मोरे
आॅनलाईन लोकमत
अमरावती: अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विहीगावच्या जिल्हा परिषद पूर्वमाध्यमिक शाळेतील दोन शिक्षक कायमच मोबाईलवर व्यस्त राहत असल्याची तक्रार पालकांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
दोन्ही शिक्षक तासनतास मोबाईल बोलत असल्याचे विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना सांगितले होते. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी तक्रार केली आहे. हे दोन्ही शिक्षक मोबाईलवर वेळ गमावत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याचा पालकांचा आरोप आहे.
पालकांचा उपोषणाचा इशारा
‘हे मोबाइलप्रेमी शिक्षक आमच्या मुलांना शिक्षणापासून दूर नेत आहेत. या शाळेतील संबधित शिक्षक शाळेत कधीच वेळेवर येत नाहीत. आलेच तर कानात हेडफोन लावून गाणी एैकत असतात. अशा शिक्षकांची चौकशी व त्यांच्याविरु द्ध कारवाई करावी, अन्यथा आम्ही उपोषणाला बसू,’ असे पालकांनी सांगितले. त्यांनी आंदोलनाचा इशारा देणारे एक निवेदन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहे.
असा झाला खुलासा
संबंधित शिक्षकांचे प्रेमसंबंध मोबईलवर अतिशय उतू गेल्यामुळे वर्गातील विद्यार्थ्यांनी कंटाळून ही बाब आपल्या पालकांच्या कानी घातली. यानंतर याची विचारणा शिक्षकांना करण्यात आली. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. परिणामी, पालक पंचायत स्मतीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यावर संबंधित शिक्षकांना पंचायत समिती शिक्षण प्रशासनाने नोटीस देवून चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे कळविले आहे.
कॉल डिटेल्स काढण्याची मागणी
संबंधित शिक्षकांचे प्रत्येकी दोन मोबाईल क्र मांक सुद्धा प्रशासनास देण्यात आले आहेत. हे शिक्षक कुणाशी बोलतात, किती वेळ बोलले, याबाबतचे पूर्ण रेकॉर्ड काढण्याची मागणी सुद्धा निवेदनात केली आहे. शाळा उघडण्यापासून दांड्या मारणाऱ्या व आलेच तर मोबाईलवर बोलणाऱ्या या शिक्षकांवर कोणती कारवाई होते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.