अमरावती जिल्हा होणार १७ तालुक्यांचा !
By admin | Published: February 5, 2015 10:59 PM2015-02-05T22:59:25+5:302015-02-05T22:59:25+5:30
जिल्ह्याची मागणी प्रशासकीय स्तरावर जुनीच असताना जिल्ह्यात आसेगाव, चुरणी व बडनेरा या तीन नवीन तालुक्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता १४ ऐवजी १७
नरेंद्र जावरे - अमरावती
जिल्ह्याची मागणी प्रशासकीय स्तरावर जुनीच असताना जिल्ह्यात आसेगाव, चुरणी व बडनेरा या तीन नवीन तालुक्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता १४ ऐवजी १७ तालुके होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अचलपूर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव शासनस्तरावर धूळखात पडून आहे. अनेक वर्षांपासून राजकीय नेत्यांनी आश्वासनाची खैरात जनतेपुढे मांडून मतांची गोळाबेरीज केली. प्रत्यक्षात अचलपूर जिल्हा निर्मिती अजूनपर्यंत झाली नाही. अमरावती जिल्ह्यात मेळघाट हा आदिवासीबहुल भाग असून चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ चुरणी परिसरात जवळपास ६० गावांचा समावेश आहे. मध्यप्रदेश सीमारेषेवर असलेल्या चुरणी परिसराला तालुका घोषित करण्याची मागणी पाहता मागील दहा वर्षांपासून प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. दुसरीकडे चांदूरबाजार तालुक्याचा वाढता व्याप पाहता आसेगाव तालुका निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. अमरावती महानगर अंतर्गत बडनेरा शहर असताना ग्रामीण भागाचा नवीन बडनेरा तालुका करण्याचा प्रस्ताव शासनाकडे आहे. एकंदर जिल्ह्यात आता तीन नवीन तालुक्यांची मागणी व अचलपूर जिल्ह्याची मागणी होत आहे. नवीन युती शासनात विदर्भ वेगळा झाल्यास एक जिल्हा व तीन तालुके होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आसेगाव हा नवीन तालुका निर्माण करावयाच्या अनुषंगाने २७ नोव्हेंबर २०१३ रोजी उपविभागीय अधिकारी नवीन तालुका निर्माण करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे आसेगाव पूर्णा नवीन तालुक्याचा प्रस्ताव ५ एप्रिल २०१४ रोजी पाठविण्यात आला. आसेगाव हा नवीन तालुका निर्माण करण्याच्या हा प्रस्ताव २०११ च्या जनगणनेनुसार सादर करण्यात आला.
या तालुक्यात तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी, कृषी मंडळ, विद्युत वितरण कंपनी, पोस्ट आॅफीस, जीवन प्राधिकर, ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, इंडियन बँक, दि. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक, विद्यालय, महाविद्यालय, प्राथमिक शाळा इत्यादी कार्यालय असल्याचे नमुद करण्यात आले. हा तालुका निर्माण करताना सीमा रेषाचा आधार घेवून अचलपूर, दर्यापूर, भातकुली या सीमालगत तालुक्यातील गावे कशा पध्दतीने सोईस्कर राहू शकतात, याची माहिती ही जोडण्यात आली.