अमरावती विभागातून अकोला, यवतमाळ जिल्हा अव्वल, निकालात मुलीच आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:11 AM2021-07-17T04:11:35+5:302021-07-17T04:11:35+5:30
अमरावती : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दुपारी १ वाजता इयत्ता दहावी २०२१ चा निकाल ऑनलाइन ...
अमरावती : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दुपारी १ वाजता इयत्ता दहावी २०२१ चा निकाल ऑनलाइन जाहीर केला. यंदा दहावीच्या निकालात अमरावती विभागातून अकोला व यवतमाळ अनुक्रमे आघाडीवर आहेत. अमरावती विभागाचा निकाल ९९.९८ टक्के लागला असून, राज्यात कोकणनंतर अमरावती दुसऱ्या स्थानी आहे. कोरोना संक्रमणाने ना शाळा, ना परीक्षा तरीही निकालाने विद्यार्थ्यांवर गुणांचा वर्षाव केला आहे.
दरवर्षी अगोदर बारावीचा निकाल जाहीर केला जातो; मात्र यंदा परीक्षाविना निकाल हे सूत्र अवलंबविल्याने दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यात नियमित विद्यार्थ्यांमध्ये मुलांपेक्षा मुलीच आघाडीवर आहेत. नववी, दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या ३०. ३०. ४० या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकालाची टक्केवारी बघता शाळांनी विद्यार्थ्यांना भरभरून गुण दिल्याचे वास्तव आहे.
अमरावती विभागात दहावीसाठी नोंदणी झालेले नियमित विद्यार्थी १५८८३९ होते. त्यापैकी १५८८३७ मूल्यांकन प्राप्त असून, १५८८१६ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. गतवर्षी दहावीचा निकाल ९५.१४ टक्के लागला होता. यंदा निकालात ९९.९८ टक्के लागला आहे. विभागात इयत्ता दहावीसाठी १६८६०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६७४५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, १५९३१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकोला ९९.९९ टक्के, अमरावती ९९.९७ टक्के, बुलडाणा ९९.९८ टक्के, यवतमाळ ९९.९९ टक्के आणि वाशिम जिल्हा ९९.९८ टक्के निकाल जाहीर झाल्याची माहिती पत्रपरिषदेतून अमरावती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव नीलिमा टाके, सहसचिव जयश्री राऊत यांनी दिली.
---------------------
जिल्हानिहाय निकाल
जिल्हा नोंदणी झालेले मूल्यांकन प्राप्त उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी
अकोला २६९९१ २६९९१ २६८५८ ९९.९९
अमरावती ४०६७८ ४०६७७ ४०५३१ ९९.९७
बुलडाणा ३९६६३ ३९६६२ ३९४६१ ९९.९८
यवतमाळ ३८०६९ ३८०६९ ३७९५९ ९९.९९
वाशिम १९७२३ १९७२३ १९६९२ ९९.९७
------ -------- --------- --------