पदवीधरांचा कौल कुणाला? आज मतमोजणी, २३ उमेदवारांमध्ये चुरस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 11:09 AM2023-02-02T11:09:27+5:302023-02-02T11:12:19+5:30

उशिरापर्यंत राहणार प्रक्रिया

amravati division graduates constituency election result today, who will win? | पदवीधरांचा कौल कुणाला? आज मतमोजणी, २३ उमेदवारांमध्ये चुरस

पदवीधरांचा कौल कुणाला? आज मतमोजणी, २३ उमेदवारांमध्ये चुरस

googlenewsNext

अमरावती : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवार २ फेब्रुवारीला सकाळी ७ पासून सुरू झाली आहे. रिंगणात २३ उमेदवार आहेत. त्यांना १०२४०३ मतदारांनी मतदान केलेले आहे, यापैकी कुणाला पदवीधरांचा कौल मिळतो, याकडे पाचही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

येथील नेमाणी गोडाऊन येथे मतमोजणी होत आहे. या अनुषंगाने सर्व आवश्यक तयारी करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी एकूण अठ्ठावीस टेबलची व्यवस्था असून मोजणीसाठी २८ पथके तयार करण्यात आली आहेत.

टपाली मतपत्रिका प्राप्त करून मतमोजणी, विवरणपत्रे भरून टॅब्युलेशन टीमकडे पाठविण्याची जबाबदारी उपायुक्त संजय पवार यांच्याकडे आहे. उपजिल्हाधिकारी राम लंके व तहसीलदार व इतर अधिकारी या कामात साहाय्य करतील. संपूर्ण मतमोजणीचे समन्वयन करण्याची जबाबदारी उपायुक्त गजेंद्र बावणे यांच्याकडे असून, सहायक अधिकारी म्हणून सहायक आयुक्त श्यामकांत म्हस्के, विवेकानंद काळकर, तहसीलदार रवी महाले आदी काम पाहतील. रो अधिकारी म्हणून सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यानथन, सहायक जिल्हाधिकारी याशनी नागराजन, सहायक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सहायक जिल्हाधिकारी सावनकुमार, उपायुक्त अजय लहाने, उपायुक्त विजय भाकरे काम पाहतील.

गणना पर्यवेक्षक, तसेच इतर कामकाजासाठी विविध जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आदी अधिकाऱ्यांना नेमण्यात आले आहे. मतमोजणी सुरळीत पार पडण्यासाठी मतमोजणी परिसरात जिल्हा दंडाधिकारी पवनीत कौर यांच्या आदेशान्वये निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

मतमोजणी केंद्र परिसरात विविध निर्बंध लागू

१) उमेदवार किवा उमेदवाराचे प्रतिनिधी आणि मतमोजणी अधिकारी,कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही मतमोजणी स्थळाच्या १०० मीटर परिसराच्या आत प्रवेश प्रवेश नाही,याठिकाणी झेरॉक्स,फॅक्स मशीन,ई-मेल, इतर संपर्क साधनांचा गैरवापर प्रतिबंध करण्यात आला आहे.

२) मतमोजणी ठिकाणाच्या १०० मीटर परिसरामध्ये मोबाइल फोन,वायरलेस सेट, ट्रान्झिस्टर, कॅल्क्युलेटर आदी प्रकारच्या साधनांच्या वापरावर प्रतिबंध आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा हा आदेश २ फेब्रुवारीच्या सकाळी ६ वाजतापासून मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत लागू आहे.

पाचही जिल्हाधिकारी यांच्याकडे विविध जबाबदाऱ्या

अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर,अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा,यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे,बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. ह. पी. तुम्मोड यांच्याकडे संशयास्पद मतपत्रिका तपासून अंतिम निर्णयास्तव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. वाशिमचे जिल्हाधिकारी एस. षण्मुगराजन यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना साहाय्य करण्याची जबाबदारी आहे.

Web Title: amravati division graduates constituency election result today, who will win?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.