लग्नाला जाईन तर लालपरीनेच; महिनाभरात १७ कोटींची कमाई
By जितेंद्र दखने | Published: June 1, 2023 05:49 PM2023-06-01T17:49:50+5:302023-06-01T17:53:21+5:30
विभागात आठ आगारांच्या उत्पन्नात कोटीचे उड्डाण
अमरावती : राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागाने १ ते ३० मे या कालावधीत सुमारे १७ कोटी ८३ लाख ७२ हजार ९३ रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळविले आहे. उन्हाळी सुटी, लग्नसराईमुळे संपूर्ण मे महिन्यातील हंगाम गर्दीचा राहिला. या हंगामात विभागात ३३० बसद्वारे फेऱ्या विविध मार्गावर सुरू केल्या आहेत. महामंडळाने सध्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता जादा बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परिणामी, लग्नसराईची धूम सध्या लय भारी सुरू आहे. त्यामुळे महामंडळाच्या तिजोरीत कोट्यवधीच्या कमाईची भर पडली आहे.
महामंडळामार्फत महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत योजना व ७५ वर्षांवरील नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत मोफत प्रवास योजना सुरू केली आहे. याला प्रवाशांचा प्रतिसाद प्रचंड वाढत आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या कालावधीत विभागातील सर्व ८ आगारांतील चालक, वाहक, यांत्रिक कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय सांघिक महिला सन्मान योजना- कामगिरी केल्याने विभागाच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी अभय बिहुरे यांनी सांगितले. जादा फेऱ्यामुळे प्रवाशांची सुविधा झाल्याने महामंडळाच्या उत्पन्नात मोठी भर पडली आहे.
३३० बस धावल्या ३४.०३ लाख कि.मी.
१ ते २८ मे या कालावधीत अमरावती आगारातून ५२, बडनेऱ्यामधून ४०, परतवाडा आगारातून ५४, वरूड ४०, चांदूर रेल्वे ३५, दर्यापूरमधून ४२, मोर्शीतून ३३, चांदूर बाजार ३४, अशा ३३० बस रोज सोडण्यात आल्या. एकूण १७ कोटी ८३ लाख ७२ हजार ९३ रुपये उत्पन्न आणि ३४.०३ लाख किलोमीटर या बस धावल्या.
असे मिळाले विभागाला उत्पन्न (लाखांत)
प्रवासी उत्पन्न - १११७००१२४
महिला सन्मान - ३९५९०५८९
ज्येष्ठ नागरिक - ६१५४४५५
अमृत ज्येष्ठ नागरिक - २०९२१९२
एकूण : १७८३७२०९३
आगारनिहाय उत्पन्न (कोटीत)
अमरावती २६७२१०४८, बडनेरा २०४४७८९३, परतवाडा २८३८०५६२, वरूड २२७५६८७२, चांदूर रेल्वे १८५०२०३४, दयार्पूर २२२१७६७४, मोर्शी १८६८५७५७, चांदूर बाजार १८६७०४९९ रुपये या प्रमाणे उत्पन्न मिळाले आहे.